तीन गझला : जयराम धोंगडे

 



१.


लाभासाठी जगलो नाही

त्यागाने मी थकलो नाही


काही वाटा वळणाच्याही

वळलो थोडा,चळलो नाही !


झुकवायाला टपले सारे

ते थकले मी, झुकलो नाही!


आल्या गेल्या व्याधी,बाधा

लढलो, पण मी बधलो नाही!


अडलो,नडलो,धडपडलो मी

पडलो,घडलो, कुढलो नाही!


बघता खोटे चिडचिड झाली 

सोसत गेलो,चिडलो नाही!


मी थोडासा हळवा आहे 

कळवळलो पण रडलो नाही!


२.


भावनेला भावनेचा भार झाला

सांत्वनेचा या मना आधार झाला


तू दिलासा मज दिल्यावर सावराया,

शब्द साधा काळजाची तार झाला


दुःख सारे क्षीण होती जर पिल्याने

ग्लास आता राहिला ना धार झाला


काय पारू काय चंदा फक्त दारू

देवदासा कोणता आजार झाला?


दुःख होते,दुःख आहे,दुःख राही

कोण आहे सांग ना बेजार झाला?


३.


उरी हुंदक्याला उगा पोसतो का?

किती डंख झाले तया मोजतो का?


इथे दुःख आहे सदा सोबतीला

नको खेद मानू जिवा कोसतो का?


गुलाबासभोती असे फास मोठा

तरी त्यास काटा कधी टोचतो का?


झटक सर्व चिंता नको ताण घेऊ,

फुकाची पिडा ती वृथा सोसतो का?


असो भोग काही तथा वेदना त्या,

सलोखा सुखाचा मना बोचतो का?


No comments:

Post a Comment