१.
या बघा केंव्हातरी निरखून शाळा
सारखी बोलावते आतून शाळा
चालले आहे कसे शिस्तीत सारे
कोण गेलेला इथे भरवून शाळा
चार भिंती, बाकडे अन् एक घंटा
ठेवते हे विश्व सांभाळून शाळा
भाबडी चिमणी मला खिडकीत दिसते
रोज म्हणते, "सोड अर्ध्यातून शाळा"
बालपण हातातुनी निसटून गेले
राहिली केवळ मला बिलगून शाळा
बोट आईचे तिथे पकडून जावे
एकदा यावी पुन्हा परतून शाळा
२.
तेच ते गाणे नव्याने आळवावे लागते
गायचे नसले तरीही गुणगुणावे लागते
वाटली वरवर जरी ती दीप स्तंभासारखी
पुस्तकांना माणसागत पारखावे लागते
होत नसतो भार हलका हुंदक्यांनी आतला
पापण्यातुन काळजाला ओघळावे लागते
लाभली नाही जरी केंव्हा सुखाची गोधडी
स्वप्न डोळ्यावर उद्याचे पाघंरावे लागते
मी कसे नाही म्हणू या भावनेपोटी कधी
आवडत नसले तरीही 'हो' म्हणावे लागते
मुखवटे घालून फिरती भोवताली माणसे
पण खरे ते आरशाला दाखवावे लागते
३.
आतल्या कोलाहलाला रोखताही येत नाही
अन् कधी बाहेर त्याला काढताही येत नाही
लागला आहे मला रस्ता उताराचा असा की
चालताही येत नाही थांबताही येत नाही
शेवटी पत्रामधे जो नेमका मजकूर होता
अक्षरे होतात धूसर वाचताही येत नाही
चार दिवसांची अता माहेरवाशिण पाहुणी तू
भेटताही येत नाही टाळताही येत नाही
सारखे उलट्या दिशेने वाहते आयुष्य माझे
पण मला डोहाप्रमाणे साचताही येत नाही
.................................................
दिवाकर मा. जोशी
परळी वैजनाथ. जि.बीड
मो.8668453390
वाह सर, जिओ👌👌💐💐❤️❤️
ReplyDeleteएकदम भारी गुरुजी👍
ReplyDeleteव्वा. क्या बात है. सर्वच गझला आवडल्यात.
ReplyDeleteखूप छान गझला जोशी सर! 👍
ReplyDelete