१.
श्रेय लाटण्यासाठी सारे लगेच होती तयार येथे
पण मग येता वेळ द्यायची होती सारे फरार येथे
हात अडखळे का साऱ्यांचा छदाम देण्या मदतीसाठी
सल्ला देण्या फुकट परंतु सारे कायम उदार येथे
मिळेल सुख या आशेवरती धावधावती पैशामागे
रोकड जमते गल्ल्यामध्ये अन् राही सुख उधार येथे
ठेवावा विश्वास कसा मी सोज्वळ दिसणाऱ्यांच्यावरती
मास्क लावुनी सात्विकतेचा ढोंगी करती शिकार येथे
एक हरपले माझ्याकडचे सदैव काही मिळता दुसरे
सुखास माझ्या होती कायम दु:खाची का किनार येथे?
मुळीच नाही भिती मनाला नकार अथवा होकाराची
आयुष्याच्या वाटेवर मी लाख पचवले नकार येथे
झोप हरवते भूक विसरते आणिक होती भास नवनवे
प्रेमाइतका जहाल दुसरा सांगा कुठला विकार येथे
आयुष्याची गोड फळे मी तिच्याबरोबर चाखत होतो
हात निखळता अता तिचा हे जीवन वाटे सुमार येथे
घर,गाडी अन् सारे काही मिळवुन देते एक स्वाक्षरी
जागा देइल मनात पक्की असा कोणता करार येथे
२.
कधी जाणले नाही कोणी दुःख अंतरी दडलेले
खरे वाटले साऱ्यांना का हास्य मुखावर असलेले
खरा वाटला स्वातंत्र्याचा मला कसा तो देखावा
मनास माझ्या दिसले नाही जाळे भवती विणलेले
तडफत होते जगताना मी प्रेमासाठी अपुल्यांच्या
भेटीसाठी होते सारे मरणानंतर जमलेले
जवळी नव्हता एक दागिना तरी भासले सुंदर मी
होते माझे जीवन सारे तुझ्या प्रितीने नटलेले
जरी चालते धिम्या गतीने नकोस समजू मला कमी
सशास हरवुन अखेर विजयी कासव होते ठरलेले
.................................
सायली कुलकर्णी
वडोदरा
मोबाईल:९७६३०४३९५८
No comments:
Post a Comment