१.
रात्र रात्र जागतोस,चांदण्या निहारतोस
आपुल्याच चांदणीस बिलगण्यास टाळतोस
ठेवलेस साठवून एवढे मनात रंग
रंगबावरी म्हणून का मलाच कोसतोस?
पाहतो जणू न पाहिले मला कधी जगात
मात्र दूर राहण्यास का उगाच सांगतोस?
आरशात शोधुनी न सापडे छबी तुलाच
लोचनात का निवांत माझिया न शोधतोस?
भास होतसे मलाच चित्र की असेन मीच?
सांग ना सख्या खरे कुणास तू चितारतोस?
२.
इथे मी आडवाटेला, जरासा थांब ना थोडा
नव्याने वाट शोधू या,जरासा थांब ना थोडा
मुक्याने बोलल्या होत्या तुझ्या- माझ्यातल्या ओळी
पुन्हा ऐकव जुन्या कविता, जरासा थांब ना थोडा
तुझ्या डोळ्यात लुकलुकती नदीच्या तारका साऱ्या
दिवा का सोबती घ्यावा? जरासा थांब ना थोडा
फुलांनी फेर धरला अन् कळ्याही लागल्या नाचू
तुला सांगे ऋतू हिरवा, जरासा थांब ना थोडा
दवाचा थेंब झरताना भिजाव्या पापण्या माझ्या
शहारा लाजरा टिपण्या, जरासा थांब ना थोडा
हवा आधार प्रेमाचा जिवाची काहिली होता
उतारा फक्त स्पर्शाचा, जरासा थांब ना थोडा
३.
खुशी आज ओसंडते रे किती!
तुझे हात माझ्या गळ्याभोवती!
असो भोवती अप्सराही तुझ्या
पहा मी असे भूतलाची रती!
कधी हासते अन् कधी नाचते
मुक्या भावनांना दिली तू गती!
मनाला सुखावे तुझे गीत रे
असो वा नसो तू कधी सोबती!
पहा सोडुनी मीच आले मला
तुझे प्रेमधागे मला वेढती!
मला अन् तुलाही असे वाटते
अता राहिली ना खुशी कोणती!
..................................................
प्रा. प्रतिभा सराफ
इ-१५०३, रूणवाल सेंटर,
गोवंडी स्टेशन रस्ता,
देवनार, मुंबई-४०००८८
इमेल:pratibha.saraph@gmail.com
मो:९८९२५३२७९५
No comments:
Post a Comment