दोन गझला : रामदास घुंगटकर:

 


१.


एकटा मी चाललो अन् ,वाटही दळदार आहे
थांबलो नाही कुठेही, चालणे निर्धार आहे

सत्य हा मृत्यू जिवाचा,शाश्वताचे भान नाही
जन्मला जो एकदा तो,एकदा मरणार आहे

पांढऱ्या केसात नकली, रंग काळा लावला पण्
सुरकुत्यांना झाकणारा, कोणता शृंगार आहे 

आंधळी श्रद्धा बिचारी,धर्मही लाचार झाला
मंदिरी गर्दीत आता, देवही विकणार आहे

चंद्रही करतो प्रतिक्षा, पौर्णिमेची चालताना
खाच खळगे पार करता,वाटही मिळणार आहे

पाहिल्या खोदून अस्थी,भूतकाळाच्या स्मशानी
फाटक्या वस्त्रात कुजल्या,वेदनांचा भार आहे

२.

नाते असे सुगंधी, प्रेमात जोडतो मी
नाजूक पाकळीशी,हळुवार बोलतो मी

स्पर्शून गारवा हा, उलटून रात्र गेली
जागून चांदण्यांचे,आकाश मोजतो मी

मदिरे तुझ्याविना ही,चढली नशा कशाची
गझलेत अक्षरांच्या, कैफात डोलतो मी

केसात माळलेला, गजरा सुकून गळला
वेचून त्या फुलांना, सुत्रात ओवतो मी

संदिग्ध शब्द माझा, कळला कुणास नाही
उलटी विचारधारा, उलटाच पोहतो मी

हळव्या मनास देतो,आता जरा दिलासा
हलके करावयाला, हमराज शोधतो मी

.................................
रामदास घुंगटकर, पुसद
९६२३७६५३०२

No comments:

Post a Comment