तीन गझला : सौ.प्रिया कौलवार

 



१.

तुझी मस्ती तुझा तोरा तुझे 'मी 'पण बरे नाही
क्षणाचा पाहुणा माणुस तुझे वैभव तुझे नाही

प्रखर झाले तुझ्याइतकी तुला प्राशून मी सुर्या
अता कोण्या धगीचे भय जराही राहिले नाही

मला अस्तित्व माझेही इथे टिकवायचे होते
कुणाच्या हातचे झाले म्हणुन मी बाहुले नाही

कितीदा दंश होतो ना गुलाबालाच काट्यांचा
कळ्यांचे दुःख चरचरते कुणी जर जाणले नाही

जरी नाही डवरले ते फुलांनी अन् फळांनीही
सुगंधी झाड ते त्याला कमी लेखायचे नाही

मला जिंकायचे होते तुला हरवायचे होते
तहासाठी कधीही युद्ध मी तर खेळले नाही

मनाच्या डायरीमधले गुलाबी पान होते मी
जिला तू बंद केल्यावर कधीही चाळले नाही

२.

कावड करून जातो देहास एक आत्मा
अन् जुंपतो कितीदा घाण्यास एक आत्मा

बहुधा असेल तोही पाषाण काळजाचा
देतो अखंड शिक्षा प्राणास एक आत्मा

चिंतेत रोज जगतो मारून कैक इच्छा
दररोज घेत असतो गळफास एक आत्मा

प्रत्येक तो जिवाचा आखत परीघ असतो
मानून केंद्रबिंदू कर्मास एक आत्मा

उत्तर असे समर्पक जिवनास देत जातो
करतोय कोणता हा अभ्यास एक आत्मा

अतृप्त एक इच्छा तृष्णेस जन्म देते
पडतो बळी पुन्हा मग मोहास एक आत्मा

मरणामुळेच होते जगणे अजून  सुंदर
सोडुन म्हणून जातो देहास एक आत्मा

३.

विश्वासाच्या फांदीवर मी घरटे बांधत होते
सळसळणाऱ्या पानांनी मन थरथर कापत होते

डोळ्यांमधले पाणी खारट ना ओघळले केव्हा
अश्रू माझे मिठास खाल्ल्या कायम जागत होते

गझल गुलाबी होण्यासाठी एकच कारण होते
गझलेमध्ये शब्दभाव मी त्याचे ओतत होते

झेपावत तर इच्छा होत्या पंख पसरुनी माझ्या
आत आतल्या विश्वासाला तेच खुणावत  होते

रूप बदलते सृष्टीचे या मला सुखावत होते
चार टपोरे थेंब सुगंधी मन थंडावत होते

सहज म्हणाला होता तो की, ये ना हृदयी माझ्या
अता वाटते का मी त्याला,तेव्हा टाळत होते

कुठे मिळाली प्रियास होती गुलाब,चाफा,जाई
तुझ्या दिलेल्या मनमोगऱ्यात मन गंधाळत होते

................................
सौ. प्रिया कौलवार
पंढरपूर
मो. न 7020939617

3 comments:

  1. अप्रतिम👌👌💐💐♥️♥️

    ReplyDelete
  2. व्वा. क्या बात है. सर्वच गझला आवडल्यात.

    ReplyDelete