१.
खुलते कळी मनाची बघताच मोगऱ्याला
हातात झेल द्यावा हलकाच
मोगऱ्याला
हृदयात माळताना थोडा विचार व्हावा
नाही सुवास आता उरलाच
मोगऱ्याला
तालात आपल्याची डोलावयास सांगा
नाही कधी कुणाची पर्वाच
मोगऱ्याला
बागेत हिंडताना हसला गुलाब थोडा
पाहून राग आला भलताच
मोगऱ्याला
जेव्हा दवात न्हाला हसणे फुलून आले
केल्या किती दवाने जखमाच मोगऱ्याला
२.
गाव माझा पेटलेला आज होळी पाहतो मी
लाज झाकायास आई थांब चोळी पाहतो मी
काय झाले लेकरांना भांडणाला रंग देती
फाटलेला गा तिरंगा याच डोळी पाहतो मी
चेहरेची दाह देती जीवघेणा वीरहाचा
जीवलाव्या आशिकांची जात भोळी पाहतो मी
गात होती काल गाणी जी उषेच्या थोरवीची
अंधकारी मातलेली तीच टोळी पाहतो मी
उधळली खैरात ज्यांनी काल स्वप्नी तारकांची
याचकांची ही रिकामी आज झोळी पाहतो मी
३.
मेघात वांझ साऱ्या पाऊस शोधतो मी
गर्दीत माणसांच्या माणूस शोधतो मी
सूर्यास झाकण्याची शक्ती प्रदान त्यांना
तिमिरात काजव्यांच्या टापूस शोधतो मी
खादीत आजच्या या लपले भुजंग भारी
बापू तुझ्या सुताचा कापूस शोधतो मी
झिंगून मायभूच्या प्रेमात टाकणाऱ्या
देशात या नशिल्या दारूस शोधतो मी
वाटेत जीवनाच्या काटेच सांडलेले
आता पुन्हा नव्याने झाडूस शोधतो मी
........................................
प्रा.चंद्रकांत बहुरूपी,
विद्यानिकेतन काॅलनी,
कोर्ट रोड, परतवाडा
ता.अचलपूर जि.अमरावती
No comments:
Post a Comment