तीन गझला : सुभाष नाकतोडे





१. 

काळजाला काळजाची हाव नाही
वेदनेचा भार त्याची पाठ वाही

मुक्तहस्ते वाटले बघ प्रेम सारे
थाप द्यावी मी घृणेची का मलाही?

हिरवळीचा रंग तोही लाल व्हावा
थंड ओठी उष्ण पेला बारमाही

पाहिलेले मी उन्हाळे, पावसाळे
रंगलेले दुःख भारी जीव साही

अंगणाच्या चिवचिवाटा काय झाले
शेष नाही का निवारा पाखराही?

तू म्हणाली--"घे जरासा स्पर्श माझा!"
का दिशा मग दूर झाल्या सांग दाही

२.

तुझा चेहरा जेव्हा बघतो,
प्रेमाचा मज अर्थ गवसतो

रात आंधळी माझी हल्ली
दिवस उद्याचा जरा हसवतो

आरशातल्या रुपास माझ्या
सारे काही क्षेम कळवतो

एक खरे मी जिवंत मुर्दा
चितेवरी त्या सदैव जळतो

दूर जरी गे प्रिये अता तू
आठवणीने मना मढवतो

भुतकाळाच्या खांबावरती
आनंदाचा ध्वज फडकवतो

३.

जगणे आले वाट्याला हे जगतो आम्ही
जगता जगता रोज नव्याने मरतो आम्ही

पर्वतरांगा दुःखाच्या त्या लांब केवढ्या
हसतो-रडतो, उठतो-बसतो, चढतो आम्ही

काळिज अमुचे पोखरले हे ज्या भडव्यांनी,
सुखा लागली कीड तयांच्या बघतो आम्ही

काळोखाची तमा न आम्हा यत्किंचितही
वेदनेतला दिवा गुलाबी धरतो आम्ही

सात पिढ्यांची रास चोरली झोपडीतली
तुझ्या विषारी विजयासाठी हरतो आम्ही

किती गाळला घाम जगाला सांग एकदा
सलाम तुझिया कर्तृत्वा मग करतो आम्ही

तुझी न किंमत अमुच्यापाशी कवडीची पण
हिशेब करता तुला हातचा धरतो आम्ही

झुकली नाही कधी मान ही पाप्यांपुढती
बलबुत्यावर नेक आमच्या घडतो आम्ही

राबराबतो वावरातल्या मातीसंगे
घास होऊनि मुखात तुझिया पडतो आम्ही

................................
सुभाष एल. नाकतोडे 'कविराज '
वडगांव (राजदी) ह. मु. यवतमाळ
७०५७८७०८८७/८०१०५०२२६३

No comments:

Post a Comment