१.
या काळजात माझ्या तू राहतेस आई
मजला अजूनही तू सांभाळतेस आई
जे जे असेल माझे ते सर्व तू दिलेले
मी नाममात्र आहे, तू जाणतेस आई
दररोज तारती मज, संस्कार तू दिलेले
कळते मला तिथे तू कुरवाळतेस आई
माझ्याहुनी तुला का, तो स्वर्ग आवडावा
तेथून का मला मग न्याहाळतेस आई?
मजपासुनी जरी तू गेलीस दूर आता
माझ्यात तू स्वतःला साकारतेस आई
२.
‘आयुष्यावर मात करावी’ असे कितीदा ठरवत गेलो
लढत राहिलो, झुकलो नाही परिस्थितीशी झुंजत गेलो
संकटकाळी उभ्या जगाशी दोन हातही केले पण मी
नात्यांमधल्या प्रेमासाठी कौल मनाचा लावत गेलो
कोणालाही छळले नाही, कोणालाही लुटले नाही
मिळेल त्याच्या थोरपणाचे कित्ते केवळ गिरवत गेलो
आप्तेष्टांच्या सहकार्याची, केली नाही कधी अपेक्षा
परोपकाराला मी त्यांच्या, किती खुबीने टाळत गेलो
जरी संपला नाही माझ्या इच्छांचा हा कधीच डोंगर,
तरी अल्पशा आकांक्षांना, पंख नभाचे लावत गेलो
वाऱ्याच्या वेगात उसळल्या, त्या दबलेल्या मुक्या वेदना
निःशब्दास्तव, व्यर्थ साकडे शब्दांना मी घालत गेलो!
३.
नका विचारू प्रश्न पांगळे पुन्हा पुन्हा रे
प्रश्नांचेही प्रश्न निराळे ना कळणारे
ईर्षा केली, खंत वाहिली, जीवनभर मी
समोर उरली नात्यांची ही शुष्क पठारे
उदास होते सांज पुन्हा का एकांताची?
असे कसे हे खिन्न रितेपण तळमळणारे?
तुझा होउनी तुला पहावे, तुला स्मरावे
तुझ्याविना हे मूक वाहती उदास वारे
मना मनाचे रूप निराळे कुणास कळले?
हवे हवेसे बोल जरा तू मन जपणारे
विश्वासाने शब्द दिला अन् तिथेच फसलो
स्मरून आले बोल तुझे अन् तुझे इशारे
.................................
व्यंकटेश कुलकर्णी, हैदराबाद
इमेल: sahityavenkateshkulkarni@gmail.com
फोन: 9500484442
वाह.. खूप सुंदर... व्यंकटेश 👌👌👌👌💐💐💐💐
ReplyDelete