तीन गझला : सुनील ठाकूर

 


 १.


रंग उधळायला,गंध  फुलवायला 

ये सख्या,साजणा आज हसवायला


दरवळू लागला,गंध मातीतला 

आणले बीज मी, खोल रुजवायला


टांगल्या ह्या कुणी अंबरी चांदण्या 

चंद्रही झळकला रात सजवायला 


सोडूनी का अशी दूर गेलीस तू 

एकदा ये पुन्हा घास भरवायला


का करू काळजी मी कुणाची इथे 

भेटले मित्र जर सरण रचवायला


२.


दुखाची गुंफुनी सुमने सुखाचा हार करतो मी,

दिले आयुष्य देवाने तसे सलदार करतो मी


जरी दिसण्यात मी भोळा तसा समजू नका साधा

बिना शस्त्राविनासुद्धा  खुबीने वार करतो मी


विषाचा घोट प्रेमाने कुणी  जर पाजला मजला

दुधाची धार समजूनी तया चवदार करतो मी


गुलाबी गारव्याने तू अशी थिजतेस  का वेडे

जरा बाहुत ये  सखये तुला उबदार करतो मी


खुबीने प्रश्न हा माझा निकाली काढला तू पण

तरी त्याचीच मग चिंता उगा का फार करतो मी


कशाला व्यर्थ ही निंदा करावी आज कोणाची

मला जो भेटला त्याचा सदा उद्धार करतो मी


कुणी का थांबतो येथे कुणासाठी कधी केव्हा

कुणी जर थांबला क्षणभर तया भवपार करतो मी


३.


चल गड्या,शेतात जावू राखणीला

पीक बघ जोमात आले कापणीला 


रात ही जागून काढू आजची पण,

लागते का झोप वेडी पापणीला


पाहिले मी दुःख इतके काय सांगू 

ठेवले  बांधून  सुख मी दावणीला


हंबरे गोठ्यात व्याकुळ  वासरू का?

बांधलेली गाय त्यांनी  छावणीला


पाहताना गाव सारा दंग  होता,

जोर चढला नर्तकीच्या  लावणीला


.................................

सुनील ठाकूर ,

मुर्तिजापूर. जि. अकोला 

8888356237

No comments:

Post a Comment