तीन गझला : राज राठोड

 



१.

दररोज वाढते ही डोक्यावरी उधारी
कर्जामधे बुडाली माझी हयात सारी

कोठे अजीर्ण होई मनसोक्त खावुनी अन्
कोठे कुपोषणाने घडते उपासमारी

दुष्काळ घडवतो ह्या दररोज आत्महत्या
दररोज आवळी हा गळफास सावकारी

ती जाळपोळ कोठे अन् रक्तपात कोठे
तलवार टांगलेली मानेवरी दुधारी

तू राहतोस कोठे पंढरपुरात देवा?
मग सांग मी करावी आता कशास वारी?

२.

का कळी आज कोमेजली यार हो
ही विषारी हवा ना भली यार हो

भरवसा पावसाचा करावा कसा?
भर उन्हाने पिके वाळली यार हो

बातमी कालची रोज होते खरी
नववधू सासरी जाळली यार हो

काळजाची व्यथा काळजाला कळे
ही व्यथा का कुणी जाणली यार हो

झिंगतो रोज काव्यात या मदभऱ्या
दूर मी ठेवली बाटली यार हो

३.

आता किंवा नंतर दे तू
एकदा तुझा नंबर दे तू

काळजातल्या या जखमांना
जरा सुगंधी अत्तर दे तू

ये भेटाया कातरवेळी
घरी बहाणे शंभर दे तू

वळून बघ ना जाता-जाता
घाव असेही सुंदर दे तू

घोट नशेचे हवे कशाला
नजरेला फक्त नजर दे तू

गोड गुलाबी या स्वप्नांना
हळूच येउन फुंकर दे तू

साथ हवी मज आयुष्याची
हमी एवढी बंपर दे तू

छत्री एक नि आपण दोघे
मिटवुन मधले अंतर दे तू

.................................
राज राठोड
छ.संभाजीनगर
भ्र.9011588910

No comments:

Post a Comment