तीन गझला : शरद काळे

 


१.


तिच्या पावलांचे ठसे भोवताली

कळेना मला की कधी सांज झाली


फुलांनी मनावर छुपे घाव केले

तरी ती फुलांची विचारे खुशाली


तिला दुःख होते फुले तोडतांना

तिच्या आसवांनीच भरल्या पखाली


तिचा एवढा का लळा लागला हा

अगोदर तिच्याही तिची याद आली


मला प्रेम माझे सदा सांगते की

तुझी जिंदगानी तिच्या कर हवाली


२.


उडणे जरी फुलांना आले कधीच नाही,

वाऱ्यातुनीच केली स्वप्ने मुकी प्रवाही


साऱ्या जगास द्याव्या वाटून सर्व इच्छा ,

पदरात आपल्या या  बांधून ही तबाही


दुःखात बाप माझा हसतो कसा कळेना,

अश्रूंमधून पडली नाही कुठेच स्याई


कविता,गझल ,रुबाई माझ्या सखीप्रमाणे

माझ्या असावयाची देतील तेच ग्वाही


आभाळ मुक्त आहे नुसताच भास होतो,

पंखास पाखरांच्या दिसतात बंध काही


३.


इतिहासाला नोंदच नाही ऐसा शासक आहे

या देशाचा शासनकर्ता इतका घातक आहे‌


दिवस सुखाचे, स्वप्न साजरे डोळ्यांमध्ये भरले

कुणा न कळले डोंबाऱ्याचे सारे नाटक आहे


कांदा-मिरची महाग झाली किती ओरडे जनता

अता कशाला तोंडावरती लावुन फाटक आहे


या देशाचा पोषणकर्ता देशासाठी झिजतो

तरी बळीच्या सुखदु:खाला कुठला वाचक आहे


अंधाराच्या आडोशाला बसला आहे कोणी

उजेड देण्या या देशाला का तो लायक आहे?

 

.................................

शरद बाबाराव काळे

धामणगांव रेल्वे

2 comments:

  1. खूपच छान सर,
    शेवटच्या गझलेतला शेवटचा शेर तर जबरदस्त लिहिलाय...
    उजेड देण्या या देशाला का तो लायक आहे?...

    ReplyDelete