तीन गझला : डॉ.स्वाती भद्रे

 



१.


क्षणामध्ये हजारो मैल ओलांडून येते

कुणाची आठवण जेव्हा मनापासून येते


धरेला साज चढतो श्रावणामध्ये असा की

कुणी तोऱ्यात गच्चीवर जशी न्हाऊन येते


कशी द्यावी सजा शाळेत येण्याची उशीरा

घरी उरकून कामे खूप ती लांबून येते


रिकामे ठेवते नेते कधी वाहून मडके

अवेळी पावसाची सर अशी धावून येते


पुन्हा आवेग येतो भावनांना जीवघेणा

तुझ्या गल्लीत हल्ली खूप सांभाळून येते


जरा सांभाळ आयुष्या नको तू धीर सोडू

सुखाची सावली नक्की उन्हामागून येते


कुण्याही मैफिलीने दूर जाता जात नाही

मनाला एकटेपण जे तुझ्यावाचून येते


२.


अशाने हात नाही सोडता सुटणार लेकीचा

लळा जो लागला आहे घराला फार लेकीचा


कशी होऊन आली भोपळ्या,ती जाड म्हातारी?

सुखाचा पाहिला नक्की तिने संसार लेकीचा


किती सजले तरी मी भाव नाही देत तो हल्ली

म्हणे त्याला अताशा भावतो शृंगार लेकीचा


कुणी निर्धन असूदे वा असो श्रीमंत कोणीही

जगाला बाप का वाटे सदा लाचार लेकीचा


असे लचके कितीदा काळजाचे सांग तोडावे

नको घेऊस तू गर्भा पुन्हा आकार लेकीचा


हवी पत्नी, हवी ताई, हवी मैत्रीण साऱ्यांना

तरीही वाटतो का ह्या जगाला भार लेकीचा


मला नाजूक हातांची मिठी पडताच जाणवते

किती खंबीर असतो कोवळा आधार लेकीचा


३. 


कसे बाळास देते गार वारे काय सांगू मी

किती पदरामधे जळते निखारे काय सांगू मी


कुणा समजेल का सांगून नाते कृष्ण राधेचे

तुझ्या माझ्यातले दुनियेस सारे काय सांगू मी


अनोखा स्पर्श आहे रेशमी नजरेतही त्याच्या

उभ्या अंगावरी माझ्या शहारे काय सांगू मी


सुखाचा संपतो रस्ता कुणाचा भाकरीपाशी

तुझ्या श्रीमंत दु:खांना उतारे काय सांगू मी


मला छळले किती भेटून त्याला हाय भासांनी

अता स्वप्नांमधे त्याचे पहारे काय सांगू मी


अताशा जायचा पाऊस नाही थांब ना थोडे 

तुला समजून मेघांचे इशारे काय सांगू मी 


सदा उडतोच पाचोळा जसा वाऱ्यासवे स्वाती

तुझे अस्तित्वही त्याहून न्यारे काय सांगू मी 


...........................................

डॉ.स्वाती भद्रे आकुसकर

नांदेड

9975468023

No comments:

Post a Comment