१.
हसायला,रडायला,
तुला-मला मिठी हवी
मनातले जपायला,
तुला-मला मिठी हवी
कवेतल्या नभावरी असीम चांदणे हवे
नभामध्ये जगायला,
तुला-मला मिठी हवी
उगाच बोलणे नको उगाच सांगणे नको
न बोलता कळायला,
तुला-मला मिठी हवी
पराग तू सुगंध मी छटा अनेक आपल्या
खुलायला फुलायला,
तुला-मला मिठी हवी
सभोवती बऱ्याच हॅशटॅगच्या करामती
मिठीच ट्रेंड व्हायला,
तुला-मला मिठी हवी
तुझी मधाळली नजर तुझे शहारले अधर
तुझ्यात धुंद व्हायला, तुला-मला मिठी हवी
मनातल्या मनात मी तुझ्याकडे रहायचे
तुझ्याकडे असायला,
तुला-मला मिठी हवी
२.
आपल्या दोघांतही साकव हवा होता
दूर होतो जाहलो पण गोडवा होता
वाट चुकले पाखरू चिक्कार गडबडले
आणि आकाशी बघा हसरा थवा होता
लागलेली ओढ त्याला मीच जाण्याची
थांबण्याचा मोह केवळ जोगवा होता
रात्र अवसेची तिच्यावर वळण धोक्याचे
सूर्य नव्हता चंद्र नव्हता काजवा होता
भरकटू नाही दिले त्याने समुद्राला
हो नदीचा यार माझा नाखवा होता
फार नव्हतो एकमेकांचे तसे आम्ही
मीच त्याची ऊब अन् तो गारवा होता
जी सुखे आई घरी रांधायची कायम
पंचपक्वान्ने चवींचा पाडवा होता
३.
खूप चालुन थांबल्यावर एक दिवशी
शिंपडावे दव मनावर एक दिवशी
मानले ना आपले ज्याने कुणाला
भाळला तोही सुखावर एक दिवशी
शक्यता नव्हती तुझी माझी कधीही
भेट पण झाली अनावर एक दिवशी
रात्र माझ्या इकडली घेऊन जा तू
अडचणी सोपव उद्यावर एक दिवशी
सोनचाफा लावला दारी तुझ्या मी
सावली पांघर घरावर एक दिवशी
शेत खाताना कुणीही पाहिले ना
आळ मग का कुंपणावर एक दिवशी
गोष्ट विरळी आपली आहे सख्या रे
कोरले जाऊ जगावर एक दिवशी
फारच सुंदर !!!
ReplyDeleteछान
ReplyDelete