१.
कसे येणार सुंदर गीत अधरावर?
भुकेचा टांगता जर प्रश्न डोक्यावर
बळीबद्दल तुझे लिहिणे किती वरवर!
कधी गेलास का तू सांग बांधावर ?
तिचा वर्गात पहिला नेहमी नंबर
तिच्या नादामुळे मी पास काठावर
कशाला कोरली होतीस तू नावे?
सदा मन धाव घेई त्याच बाकावर
किती करशील तू घायाळ लोकांना
नियंत्रण ठेव या नाजूक नखऱ्यावर
मनाला धाडतो संदेश का मेंदू?
छुपा करणार ती आघात हृदयावर
कुणी अबला असावी मोकळी झाली
उदासी जर नदीच्या शांत पात्रावर!
२.
कणखर विरोध सारे आधी मवाळ झाले
दोघांमधील क्षण-क्षण नंतर मधाळ झाले
चरकातुनी जणू हे आधी शरीर गेले
आयुष्य मात्र नंतर माझे रसाळ झाले
म्हणतेस तू तुझे जर सारे चरित्र लिहिले
मग आपलेच प्रकरण कोठे गहाळ झाले?
शृंगारल्या मुखावर खोटे हसू कशाला?
कळते मला तुझेही जगणे रटाळ झाले
ही कोण यौवनांगी नगरीत आज आली!
विसरून वय स्वतःचे सारे टवाळ झाले
शोकांतिका म्हणावी की शल्य मातृभूचे
मनुलाच माणसांचे तेव्हा विटाळ झाले
नक्कल बघावयाला जमतात लोक सारे
त्याचे महान भाषण केवळ गुऱ्हाळ झाले
३.
पाहिल्यावर वाटतो मी कोळसा आहे
आत माझ्या पण हिऱ्याचा वारसा आहे
टाळले जर आमिषांना जिंकता येते
सांगतो ऐका शहाणा मी ससा आहे
भावना लपवून होतो फायदा कोठे?
चेहरा जर बोलणारा आरसा आहे
मी तिच्या प्रत्येक 'हो' ला 'हो' म्हणत असतो
कोणता पर्याय दुसरा छानसा आहे?
व्यक्त कर वाक्यात एका प्रेम मी म्हटले
ती म्हणाली राज माझा राजसा आहे
.................................
आर. के. आठवले
सिल्लोड, औरंगाबाद
9011895917
No comments:
Post a Comment