१.
अंतरात प्रीतीचे रोप लावले होते
सावकाश स्वप्नांचे झाड बहरले होते
गंधधुंद सय होती फूल लाजले होते
स्पर्शताच वाऱ्याने मुक्त नाचले होते
अंत सारखा आहे जाणती जरी सारे
फार फार घाईने लोक चालले होते
हाक मारण्याआधी तेच धावले होते
संकटात मित्रांनी भार पेलले होते
फारफार मायेने भेटले कुणी जेव्हा
आसवांतुनी वेडे मौन बोलले होते
२.
हाव आहे माणसाची वाढलेली बाई
लाज सारी आज त्याने सोडलेली बाई
वागताना ठेव जागे भान अल्लड पोरी
दानवांनी नित्य आहे वेढलेली बाई
आपला संसार ज्यांना फार आहे प्यारा
रोज त्यांना का रुचावी नाचलेली बाई
का फसावी आजही ती लांडग्यांच्या हाती
संस्कृतीच्या व्यर्थ नावे बांधलेली बाई
का दिसेना लाजणारी बाहुली ती आता
राबताना आज आहे रापलेली बाई
कालचे हेटाळणारे गप्प झाले सारे
धाडसाने शीर्षस्थानी पोचलेली बाई
ती जगाचे गोड सुंदर स्वप्न होती आहे
लेकरांच्या मागण्यांनी व्यापलेली बाई
३.
काळाचा घण अवचित पडतो सरते सारे
जिवलग जातो तेव्हा नश्वर बनते सारे
डोळ्यांवरती श्रेष्ठत्वाची पट्टी चढते
वागणुकीचे भानच त्याच्या गळते सारे
हिंसेसाठी हिंसा असते उत्तर जेथे
श्वापद उरते मानवपण मग हरते सारे
संस्काराने देवत्वाला जागे कर तू
शांतीमधले सुंदर जगणे कळते सारे
विश्वासाने या जगताला जिंकत जावे
आपुलकीने जग परकेही वळते सारे
.................................
सौ.अर्चना मुरुगकर
तळेगाव दाभाडे ,पुणे
9762863231
No comments:
Post a Comment