'स्वच्छ हृदयाचे झरे'च्या निमित्ताने : शिवाजी जवरे

 



'स्वच्छ हृदयाचे झरे' हा एजाज शेख ह्यांचा गझल संग्रह त्यांनी दिला. ह्या संग्रहाचे शीर्षक आणि एजाज ह्यां कवितील साधर्म्य चटकन जाणवते. विशेषत: एजाज ह्यांना ज्यांनी एका व्यासपीठावर ऐकले, त्यांच्याशी संवाद झाला की ही स्वच्छ झऱ्याची जाणीव अधिक रुंद आणि ठळक होत जाते. मी एजाज ह्यांचे तीनचार वेळा गझल सादरीकरण ऐकले. ते ज्या कार्यक्रमात असतात, त्या कार्यक्रमातील श्रोत्यांच्या ठोसपणे ध्यानात राहतात. कारण त्यांच्या शेराचे विषय नाजूक पण सकारात्मक, घरंदाज, सभ्यतेचे संकेत देणारे पण काल्पनिक-कृत्रिम आदर्शाचे नसून सहज वर्तनसुलभ आशयाचे असतात... काय ते समजून घ्या, कदाचित मला त्यांचे अपेक्षित वर्णन करता येत नसावे.

'जग करे हेवा असा फनकार झाला पाहिजे,
तू तुझ्या गझलेतुनी गुलजार झाला पाहिजे

पाहतो प्रत्येक स्त्री अन् भेटते आई मला
या प्रमाणे स्त्री तुझा सत्कार झाला पाहिजे '

    खरेच एजाज जेंव्हा गझल सदर करतो तेंव्हा कुण्याही कवीला हेवा वाटतो. आणि त्याने 'सत्कार' ह्या 'काफिया'चा इतका आडवळणाने, कलात्मकतेने गौरव केला की खरेच हा कवी आपल्या ओळीतून गुलजार होत जातो. आणि सोबतच हा त्यांच्या गझलेतील व्यवहार्य आदर्शाचा आधी म्हटले त्याचा पुरावाही नाही काय? स्वच्छ भुईझऱ्यात कुठेही तांब्या बुडवा केवळ स्वच्छ पाणीच येते. कुठेही तसे 'स्वच्छ हृदयाचे झरे'ह्या संग्रहात कोणतेही पान उघडा तुम्हाला स्वच्छ शेर वाचायला मिळतील-

'बांधले आहेत काळाने जणू पैंजण मला
त्यातही नाचायला देणार नाहीत व्रण मला

मी जसा आहे उजळेन माझ्या आतुनी
मी हिरा नाहीच तर देऊ नका कोंदण मला

आतल्या इच्छा कळस होऊन जन्मू लागल्या
पण कळस म्हणतोय की बनवा धुळीचा कण मला '

    दुसरा शेर हे सांगतोय की कवीला त्याच्या अधिकारापेक्षा काहीही नको आहे. नेमका आज ह्याविरुद्ध प्रवृत्तीचा म्हणजे कुठेही जागा पटकावणाऱ्या गर्दीचा केवढा रेटा वाढला आहे!

'आयुष्यभर रुताया हे शल्य राहिले
माणुसकीत जेंव्हा वैफल्य राहिले

हातावरील रेषा गेल्या मिटून पण
हातामधे निरंतर कौशल्य राहिले

संसार धर्म नाती मी सोडल्यामुळे
माझ्या घरी तुक्याचे कैवल्य राहिले '

   ह्या शेरांवर काय बोलावे? माणसाच्या अंतर्मनातील सूक्ष्म छटा एजाज शेख अचूकपणे टिपतात, तेव्हा त्यांची गझल, सादरीकरणाच्या आधाराविनाही म्हणजे श्रोत्यांच्या आवडीच्या परिघातून वाचकांच्या पानाची होऊन जाते. बघा-

'तुझ्या हातात थरथर, देह शोकाकुल आहे का?
तुला आजार झाल्याची अशी चाहूल आहे का?

वयाची सत्तरी आली तसा मी खुळखुळा झालो
जणू माझ्यात एखादे निरागस मूल आहे का?

किती घेणार तुम्ही भाकऱ्या भाजून माझ्यावर
अरे मी माय आहे, पेटलेली कुल आहे का?

शुभेच्छा एकमेकांना अता देतो कुठे आपण 
तुझ्या-माझ्यात ईर्षेचा विषारी पूल आहे का?"

   कलावंत किंवा निर्माता आपल्या निर्मितीतून व्यक्त होतो असे म्हणतात. हे त्याचे व्यक्त होणे म्हणजे त्याची एक अपरिहार्यता असते. कारण निर्मितीच कलावंताला निर्माण करण्यास बाध्य करते. म्हणून खरा कलावंत सातत्याने आणि निष्ठेने निर्मितीप्रक्रियेत असतो. जसे की कवी असेल तर तो आपल्या स्वभावधर्मानुसार कोणत्याही अवस्थेत कविताच करीत राहीन- जसे की-

'झेलता श्रावण शिरवा मी कविता केली
सोसता भीषण वणवा मी कविता केली ' 

-आणि अशी ही निर्मिती होतांना तिच्याद्वारे आपण प्रमाणिकपणे व्यक्त झालो काय, ह्याचा पडताळा घेण्यासाठी कवितेशी संवाद करण्याचा एक विलक्षण प्रयोग शेख ह्यांनी केला.     

ते जणू कवितेलाच सांगत आहेत, बघ बरे, मी आपला 'असा' आहे बुवा, तू त्याला कितपत पुष्टी देते, तेच आता बघायचे आहे.-

'जरा उशिरा समजले की जगावर भार मी कविते

मलाही माहिती नव्हते किती लाचार मी कविते

प्रकाशाला तुझ्या किंमत खरी माझ्यामुळे आहे

दिव्याची ज्योत तू आहेस तर अंधार मी कविते

मला हृदयातूनी काढून दाखव शक्य झाले तर

तुझी तळमळ तुझे औषध तुझा आजार मी कविते"

संवाद हा शेख ह्यांच्या कवितेचा सहजभाव आहे. त्यांच्या अधिकांश शेरातून तुम्हाला समोरा-समोर चर्चा केल्याचे जाणवेल. त्यातही गझलचे तर वैशिष्ट्यच 'संवाद' आहे. आणि हा कवी आपल्या निर्मितीशीही म्हणजे कवितेशी संवाद करतो. आयुष्याचे रंग उमजण्यासाठी काव्य आणि कवितेचे जीवनातील स्थान सांगतांना शेख म्हणतात-

'तो तसा तोंडात साखर ठेवतो
फक्त नजरेआड खंजर ठेवतो

रंगही बेरंग त्याला भासतो
जो कवींपासून अंतर ठेवतो '

हा कवी कुटुंबवत्सल आणि समाजशील आहे. समन्वय आणि सहृदयता ह्यातून समेट तसेच समूहकल्याण साधले जात असेल तर 'फिराक' ह्यांच्या-

'तुझे घाटा न होने देंगे कारोबार-ए-उल्फत में
हम अपने सर तेरा ए दोस्त हर नुकसान लेते हैं '

अशी भूमिका घेण्याच्या तयारीत असतो. बघा-

'धडे गिरवतांना जगण्याचे हीच गोष्ट आवडली की
कर्तृत्वाला पुढे करावे आणि घराणे झाकावे

कंटाळत आहे दुनिया माझ्या दु:खाच्या ओळींना
मला वाटते आता माझे मी रडगाणे झाकावे '

समकालीन सामाजिक संदर्भ, गतिमान परिवर्तनाचे एकूण समाजजीवनावर झालेले परिणाम   ह्या कवीने कसे टिपलेत बघा-

'अता कुठे जखमेवरती खपली आलेली आहे.
आणि स्मृतींना पुन्हा तुझी हुक्की आलेली आहे.

थोडा वेळ मनाला माझ्या भीती वाटत होती
पण वेळेच्या आत घरी मुलगी आलेली आहे.

दुर्मिळ झाले सडा-सारवण आजी आजोबाही 
सर्वांच्या पायाखाली फरशी आलेली आहे.

बिन आईची लेक अडकली दुविधेमध्ये ह्या की
कसे म्हणावे बापाला, पाळी आलेली आहे. '

         वरील रचनेत सडा-सारवणाच्या शेरावर मी ह्यासाठी अधिक थांबलो की एकत्र कुटुंब गेले तशी मातीही गेली. सिमेंटचा रस्ता आणि लगेच गट्टू किंवा फरशी आली. गावात अशी अवस्था आणि रानात म्हणाल तर वन विभागाने केलेली वॉटर होल मध्ये पाणी असेल तर ठीक अन्यथा, अन्यत्र पाण्याचा थेंब नाही. अशा अवस्थेत झाडे लावावी कुठे आणि जगवावी कशी? म्हणून ह्या निमित्ताने मी सांगितलेला आणि आता आठवलेला शेर असा आहे -

'अंगणी माती दिसेना, राहिली ना ओल रानी
वृक्ष लावा हे खरे, पण सांग कोठे वृक्ष लावा? '

बिन आईच्या लेकीची अडचण सुचायला तर 'एजाज शेख'च पाहिजे. एवढे परकाया प्रवेशाचे 'कौशल्य' (खयाली फन) त्यांच्याच 'हातात' (तसे मला 'लेखणी'त म्हणायचे होते, पण त्यांनी शेरामधे 'हातात' असे लिहिले आहे.) राहू शकते. खरे तर पिकासो म्हणतो की चित्रकार बोटांमधून नाही, तर मेंदूतून चित्र काढतो. कौशल्याचे 'राहणे' जरी भाषेच्या मर्यादेमुळे बोटांच्या किंवा लेखणीच्या संदर्भाने म्हणावे लागते, तरी समाजातील सुख-दु:ख किंवा कोणताही अनुभव आपल्या चिंतनातून साकारतो आणि मग तो लेखणी-हातातून उतरतो. ते मौलिक चिंतन एजाज शेखांच्या जगण्याचा, निदान काव्य प्रक्रियेचा तरी एक भाग झाला आहे. तो सर्वच कवी कलावंतांचा असतो. परंतु तो चिंतनाचा स्तर आणि शब्दयोजनेची तरळता यांचा सुंदर मेळ साधता आला पाहिजे. तो शेख ह्यांना विशेष साधला आहे. एजाज शेखांची ही तरळता विशेषता विशाल ब्रह्मानंद राजगुरू ह्या स्वत: गझलकार असलेल्या आणि खोलीच्या समीक्षकाने आपल्या प्रस्तावनेत अत्यंत 'वकुबा'ने नोंदली आहे. सुरेश भटांचे, पुढील कवींच्या संवेदना आणि भाषेच्या संबंधी जे द्रष्टेपण होते, ते सिद्ध करणाऱ्या कवींपैकी एक कवी एजाज शेख आहेत, हे निश्चित! त्यांच्या ह्या संग्रहातील आणखी कितीतरी शेर घेता आले असते आणि आणखी कितीतरी पाने मला लिहिता आली असती, पण मग वाचकांना प्रत्यक्ष हा संग्रह वाचायला तेवढी उत्सुकताही मागे ठेवली पाहिजे ना? म्हणून आता कृतज्ञतेच्या भावनेसह थांबतो. एजाज भाईंनी हा संग्रह भेट देऊन चांगल्या रचना वाचण्याचा आनंद नव्हे, तर स्वच्छ झऱ्याचे चार घोट माझ्या ओंजळीत ओतलेत. भविष्यातही ते असेच आपल्या लेखणीतून वाचक-श्रोता रसिकांना आनंद देतील हा विश्वास व्यक्त करून थांबतो.                  

................................                                      शिवाजी जवरे                              बुलढाणा ८०७६०९५३१२

1 comment:

  1. शिवाजी सर आणि एजाज भाई आपणांस वर्ध्याच्या संमेलनात ऐकता आलं. एजाज भाईंच्या स्वच्छ गझलांचा झरा अविरत खळखळत राहो ही मंगल कामना.

    ReplyDelete