१.
तुला ओढ माझी, मलाही तुझी
किती याद येते विठाई तुझी
जगापासुनी तीच जपते मला
कशी दृष्ट लागेल आई तुझी
मनाने किती माणसे जोडली
खरी हीच आहे कमाई तुझी
जरी वाटते आटल्यासारखी
व्यथा खोल आहे प्रवाही तुझी
तुझ्या सावलीला उभे राहिलो
फुले वेचली बारमाही तुझी
अता याक्षणी भेट म्हणतोस तू
किती मागणी आततायी तुझी
जरी टाळले तू मला सांगणे
नजर सांगते खूप काही तुझी
विचारू नको प्लीज समजून घे
कधी बोलले सांग नाही तुझी?
नको थेट तर भेट स्वप्नात दे
तिथे यायलाही मनाई तुझी
जगावेगळे हे तुझे वागणे
दिली तूच व्याधी, दवाही तुझी
निळाशार सागर, निळे हे गगन
मला व्यापते ही निळाई तुझी
२.
ऊन डोईवर जरी पायी फुफाटा
वेदना तुडवीत जाती पायवाटा
बंद जर केलीस तू दारे मनाची
माहिती आहेत साऱ्या चोरवाटा
त्याच वाटेवर पुन्हा पाऊल नेते
कैकदा रुतला जिथे पायास काटा
चित्त काही स्थीर होता होत नाही
सारख्या उठतात लाटेतून लाटा
पाखरे झाली मुकी गावातली अन्
एकटेपण सोसतो आहे चव्हाटा
दे सुखाची वाटणी केव्हा म्हणाले?
मागते आहे तुझ्या दुःखात वाटा
३.
क्षितिजावरचे हसरे तारे मावळले
गरज संपली तसे उमाळे मावळले
चुकला नाही अस्त इथे सूर्यालाही
कितीतरी 'मी' 'मी' म्हणणारे मावळले
परिचय झाला दुनियेशी जसजसा तिचा
नजरेेमधले भाव कोवळे मावळले
धुमसत होते रोज आतल्या आत शहर
वाटत होते जरी निखारे मावळले
ही प्रेमाने जादू आहे केलेली
किती विरोधक होते सारे मावळले
पुन्हा सुखाची उन्हे चमकली सोनेरी
दुःखाचे वादळ आलेले मावळले
जपून ठेवू काळजातले इंद्रधनु
वयोपरत्वे रूप जरी हे मावळले
प्रकाशात न्हाऊन निघाल्या दहा दिशा
तसे काजवे टिमटिमणारे मावळले
बुडू लागली तीच तिच्या दुःखात अशी
बघता बघता तिचे किनारे मावळले
व्वा. क्या बात है. तीनही गझला अप्रतिम आहेत.
ReplyDelete