तीन गझला : निखिल माळी

 



१.

एक आठवण स्वतःभोवती फिरते
उगा बिचारी गरगर इतकी फिरते

एकटा कधीही नसतो मी आता
माझ्यासोबत एक उदासी फिरते

मी कधीचाच थकून गेलो; बसलो
माझी चिंता, ती अजूनही फिरते

खिडकीतूनी बघतो मी खिडकीला
खिडकीमधून दिसते खिडकी फिरते

गंमत वाटेल, तरी ठेव भरोसा
माझ्यामागे एक पोरगी फिरते

मी मित्रांच्या सोबत पुण्यात फिरतो
तिथे एकटी आई गावी फिरते

तुझी पोकळी भरून यावी म्हणून
माझ्यासोबत जुनी डायरी फिरते

एक सिगरेट रोज लागते आता
तेव्हा मग अंगात तरतरी फिरते

बंद ठेवतो पंखा खोलीमधला
त्या पंख्याला बांधुन दोरी फिरते

त्या बापाला नको विचारू काही
ज्याची मुलगी बिनलग्नाची फिरते

मी फिरतो अन् माझी खोली फिरते
मग चिठ्ठी इच्छामरणाची फिरते

२.

कोण पंख्याला लटकलेले बघा
कोण घेतय एकटे झोके बघा

जीव हा कंटाळला आहे कसा
कोठले सुख बोर करते हे बघा

हसत नाही रडतही नाही अता
कोण झाले कोडगे इतके बघा

हा असा मिरवायचा रडता किती
चेहऱ्याला मुखवटे हसरे बघा

ठेवले कोंडुन स्वत:ला आत मी
कोण मग बाहेर फिरणारे बघा

बंद कोणी दार वाजवले बघा
घर कुणाला आज आठवले बघा

एकदा पाहा रडुन दुनियेपुढे
अन् कुणाला दुःख मग कळते बघा

एक इच्छा ठेवुनी हृदयामधे
कोठली मग चांदणी तुटते बघा

हा कुणाचा सांडवा आला इथे
कोण आहे एवढे रडके बघा

मी उद्या असणार वा नसणार ही
यारहो, या ! आज शेवटचे बघा

३.

तुला भेटतो जेव्हा तेव्हा इतके होते
हसावयाचे नसले तरिही हसणे होते

हजार वेळा नकार होता तिचा मिळाला
हजार पत्रे तरी पुन्हा पाठवले होते

स्वतःशीच तो घालत होता वाद सारखा
बहुधा त्याचे काहीतरी बिनसले होते

तू असताना चाफा होता दरवळ होता
तू गेल्यावर सिगारेटचे तुकडे होते

कुणास इतकी आली होती याद कुणाची
कोण रात्रभर हमसू हमसू रडले होते

.................................
निखिल माळी ( चोपडे )
गोपाल नगर, खामगांव जि. बुलढाणा
( ह. मु. - पुणे )
7350078345

No comments:

Post a Comment