तीन गझला : महेन महाजन

 



१.

आसवांना प्यायचे अन् गायचे गाणे कितीदा !
पाखरांची चोच,गेले टाळु‌नी दाणे कितीदा !

तो मिठाईच्या दुकानाला उगीचच पाहतो का ?
एक मुलगा बघ खिशातिल मोजतो नाणे कितीदा !

डाग आत्म्याला तुझ्या हा लागला आहे अताही
पाहिले आहे तुझे गंगेतले न्हाणे कितीदा !

एकदाही का तुला आली न माझी कीव देवा?
घातले होते तुला मी.. सांग गाऱ्हाणे कितीदा!

शेवटी घेऊन गेला हावरट मृत्यू तुलाही
टाळले होते जिथे तू सारखे जाणे कितीदा !

२.

ही विनाशाच्या दिशेने का निघाली माणसे ?
धर्म जातीच्या विषाने ठार झाली माणसे

माणसांच्या सभ्यतेच्या गोड होत्या बातम्या
मग कधी ही श्वापदांचे रक्त प्याली माणसे ?

हातचे तेव्हाच सुटले विश्वशांतीचे फुगे
माय,माती सोडुनी जेव्हा उडाली माणसे

मी उद्याच्या ह्या फुलांना काय देऊ कारणे
घेत होती अत्तराची का दलाली माणसे ?

माणसांचे हे खुजेपण दाटले गर्दीत ह्या
याचसाठी वाढली का भोवताली माणसे ?

संयमाने समजुतीने वागणारी माणसे
खेळती आता नव्याने हिंस्र चाली माणसे

३.

भिंगरी पायात आली.. गरगराया लागलो
मग हवेच्या पावलांनी मी फिराया लागलो ?

आजही येतात कानी माणसांची आर्जवे
याचसाठी काळजाला अंथराया लागलो

आपल्या घरट्यास जेव्हा पाखरांनी सोडले
झाड होवोनी मुक्याने थरथराया लागलो

शिंपले वेचावयाला हात आले चिमुकले
भान इतके ठेवुनी मी ओसराया लागलो

भोवताली दाट झाल्या संशयाच्या सावल्या
सत्य मी जगण्यातले जेव्हा स्मराया लागलो

श्रावणाची मी जशी धुडकावली आमंत्रणे
अंतरी उगवून आलो मोहराया लागलो

लोक आले हे पुन्हा का सांत्वने घेऊनिया
मी कुठे आता जरासा सावराया लागलो

.................................
महेन महाजन
आंजी (मोठी)
वर्धा
9730962901

No comments:

Post a Comment