तीन गझला : बाळू श्रीराम

 



१.

एकांत जीवघेणा, आपला वाटतो आहे
अंधार तोच आता,आज सांभाळतो आहे

रक्तात माखलेले, हातही ओळखावे तू
का बंद तोंड त्याचे,जो खरे जाणतो आहे

झोपेत पाप झाले, मोगऱ्याला नसे पर्वा
सहवास मोगऱ्याचा,आजही लाभतो आहे

मदिराच मागतो मी, आज थोडी मला दे तू
लिहिणार मी कसा रे,तू गझल मागतो आहे

भलतेच काय मी हे,आज लिहिले नकारार्थी
खोलात जा जरासा,मी मला पाहतो आहे

पाण्यात राहतो मी, ठेवतो वैर माशांशी
संघर्ष हा असावा,इतिहास सांगतो आहे

आहे समोर मृत्यू,आणि बिनधास्त मी आता
दारात तो उभा पण, शांत मी घोरतो आहे

२.

भेटू आता दोघे आपण मेल्यानंतर
मरणाचे मग सांगू कारण मेल्यानंतर

मरण्यापूर्वी होती गुर्मी तू तू मी मी
दोघांचेही जळले ' मी 'पण मेल्यानंतर

पै पै पैसा जमवत जगलो धुंदी होती
जळण्यासाठी थोडे सरपण मेल्यानंतर

छळले ज्यांनी दोघांनाही कायम येथे
रडले तेही सारे रावण मेल्यानंतर

बदनामीची भीती होती मरणे सोपे
बदनामीचे नाही दडपण मेल्यानंतर

लोभी होती नातीगोती दोघांचीही
दौलत सारी त्यांना अर्पण मेल्यानंतर

उरलासुरला वाटा काही त्यांना देतो
ज्यांनी आहे केले तर्पण मेल्यानंतर

३.

अग्नीची मी ढाल करतो,  सूर्यावरती वार करतो
रचतो चंद्राशी युती तो, पृथ्वीवर अंधार करतो

दंगल विझली येथली तर , पेटवता येते सहज ती
शेती करतो मी दुहीची, शस्त्रांचा व्यापार करतो.

भांडण होता हा अबोला , हरणे मज मंजूर नाही
ओठांचा आघात मग मी, ओठांवर अलवार करतो

अश्रूंचा हा पूर आला,
ओले सरपण धूर झाला
पटतो त्यांना हा बहाणा , हलका माझा भार करतो

आकाशाला रोग झाला, मातीचा द्या गंध त्याला
गंधासाठी तो बरसतो, हा तर मी उपचार करतो.

हसतच नाही ती जराशी,
मी खूपच बैचेन होतो
हसवाया मग मी तिलाही, सोंगेढोंगे फार करतो

भूकच मज जाळीत असते ,
जठरी माझ्या डोंब असतो
सोसत नाही भूक जेव्हा ,
पाण्याचा आधार करतो

.................................
बाळू श्रीराम
शिरपूर (धुळे )
8459361515
9011970073

No comments:

Post a Comment