तीन गझला : श्रीदासुत

 




१.


होय थोडे वेगळे आहोत आपण

ईश्वराची लेकरे आहोत आपण


हेच नात्यातील अपुले वेगळेपण

एकमेकांसारखे आहोत आपण


यामुळे तर कैकदा वाईट ठरलो...

चांगल्यांशी चांगले आहोत आपण


काळजाच्या आतले दिसणार इतके

पारदर्शी आरसे आहोत आपण


राख सुद्धा आपली झाली सुगंधी

चंदनाची लाकडे आहोत आपण


व्याध आता आपला घेतोय सेल्फी

दोन सुंदर पारवे आहोत आपण


ज्या नदीला कोणताही अंत नाही

त्या नदीचे ओंडके आहोत आपण


का करावी काजव्यांशी व्यर्थ स्पर्धा?

पौर्णिमेचे चांदणे आहोत आपण


या समाजाला जरी झालो नकोसे

पण स्वतःला पाहिजे आहोत आपण


या जगाला सूक्ष्मतेने व्यापतो त्या

विठ्ठलाची स्पंदने आहोत आपण


२.


वाटला खेळात त्यांना जो अडाणी

जिंकली त्यानेच तर पत्यात राणी


एवढा दुश्मन मिळाला खानदानी

बातमीने आणले डोळ्यात पाणी


लाभला हातास गझलेचा खजाना

शेर माझे त्यातली दुर्मीळ नाणी


गोंदलेले नाव माझे खोड नंतर...

खोड आधी काळजावरची निशाणी


रात्र दोघांची सुगंधी होत गेली

बहरली श्वासात जेव्हा रातराणी


रावणाचा यामुळे संहार झाला

राम होता एकवचनी एकबाणी


बातम्यांचा एक गोंडस काळ होता

छान होती आमची आकाशवाणी


देवळाच्या आत म्हटल्या चार गझला

ईश्वरासम भासली माझीच गाणी


वेगळी आहे जरी माझी तुझी पण

काळ संपवणार सर्वांची कहाणी


३.


यामुळे अंतर जरा राखून होतो

वार कारण नेहमी जवळून होतो


मांडल्या जातात केवळ छान ओळी

शेर एखादाच अफलातून होतो


एवढे सुंदर जरी असते तरी का?

प्रेम नावाचा गुन्हा चोरून होतो


काळजीचा त्याप्रमाणे अंत व्हावा

अंत दुःखांचा जसा भोगून होतो


तीक्ष्ण चाकूने कधीही होत नाही

घाव जितका खोलवर बोलून होतो


कोवळे अपुल्यात जेव्हा मूल रडते

आपल्या हातून अपुला खून होतो


मोगरा म्हणतो तिला मी त्याक्षणाला...

अत्तराचा स्राव माझ्यातून होतो


विठ्ठलाची आकृती तय्यार झाली

हात जेथे मी उभा जोडून होतो


2 comments:

  1. खूपच छान तीनही 👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम लिखाण... खुपचं अर्थ पूर्ण गझल लिहिल्या आहेत आपण.

    ReplyDelete