तीन गझला : गजानन वाघमारे

 



१.


सुखाला स्पष्ट दिसते की दिसत नाही ?

कि त्याला नेमके आम्ही दिसत नाही ?


तुझा पत्ता कुणाला मी विचारावा ?

इथे रस्त्यावरी कोणी दिसत नाही


हवा बाहेरची बहुधा दिसू शकते

हवा डोक्यात गेलेली दिसत नाही


तपासुन पाहिले काळीज अपुले तर

तिथे अजिबात माणुसकी दिसत नाही


जगाने लावले उलटे दिवे आता 

म्हणुन अंधारही खाली दिसत नाही


बरेवाईट जे आहे, बघुन घ्यावे 

पुन्हा मेल्यावरी काही दिसत नाही


२.


चवचाल जीवनाची उष्टी नजर निघाली

वैराग्य शोधताना इच्छाच घर निघाली


मी सत्य शोधण्याला गेलो जसा तळाला

आत्मा बुडून गेला, कायाच वर निघाली


आश्चर्य फार याचे वाटू नये कुणाला

संसद उद्या कदाचित विक्रीस जर निघाली


झाली गज़ल सुरु अन् संपुन लगेच गेली

माझी तुझी कहाणी छोटा बहर निघाली


अद्यापही म्हणे ती माझीच वाट बघते 

मी शोध घेतला तर खोटी खबर निघाली


स्पर्धेत स्पर्धकांच्या मागे कधीच नव्हतो

जातीत फक्त माझ्या थोडी कसर निघाली


ऐकू कुठून गज़ला मसणात येत होत्या 

खोदून पाहिले तर माझी कबर निघाली


३.


तुला माणूस नाही,जात दिसते,कूळ दिसते

तुझ्या डोक्यात मेंदू ऐवजी ढेकूळ दिसते


कुठे शाळा दिसो वा ना दिसो देशात माझ्या

इथे मस्जिद दिसते अन् तिथे देऊळ दिसते


चहाला दूधही नाही मिळत खेड्यात माझ्या

इथे पोथी पुराणातच कसे गोकूळ दिसते


तिच्या प्रेमामुळे नजरेसही आला फुलोरा

मला गुलमोहराच्या सारखी बाभूळ दिसते


मनाच्या चोरकप्प्याला विषाचा लेप आहे

जिभेवर माणसांनी लावलेला गूळ दिसते


जरी खुर्चीत बसलेला विषारी नाग आहे

तरीही अंध भक्तांना तिथे गांडूळ दिसते


मला अन् माझिया गझलेस याची खंत नाही 

समीक्षा ज्ञानवंतांची किती व्याकूळ दिसते


.................................

गजानन वाघमारे

महागाव जि. यवतमाळ

4 comments:

  1. तिन्ही अप्रतिम!
    👌👌👌

    ReplyDelete
  2. अप्रतिम सर्वच शेर

    ReplyDelete
  3. वाघमारे सर
    नेहमी प्रमाणे सुंदर गझला

    ReplyDelete
  4. व्वा. क्या बात है. अप्रतिम आहेत तीनही गझला. अभिनंदन.

    ReplyDelete