१.
प्रेम सत्य अन् सुंदर आहे
बाकी सगळे जर तर आहे
तिने उन्हाची साथ सोडली
एक सावली बेघर आहे
सजीव आहे तुझी कविता
तिच्या आतवर पाझर आहे
जगून घेऊ दोन चार क्षण
उभ्या जन्मभर मरमर आहे
तुला भेटल्यानंतर कळले
जीवन नितांत सुंदर आहे
तुझ्या नि माझ्यामधे पसरला
अथांग निळसर सागर आहे
जन्म बिचारा वणवण फिरतो
इच्छा फुटकी घागर आहे
२.
किती काळजावर चरे काय सांगू
तुझ्या आठवांनी दिले काय सांगू
जरा काय भिजली तिची चिंब काया
कुणी पावसावर जळे काय सांगू
तसा फार साधा तुझा प्रश्न होता
कळेना तरी नेमके काय सांगू
जसा तू तशी मी जुना तू जुनी मी
तुझे तेच माझे नवे काय सांगू
न माझ्या मनाचा मला थांग लागे
तुझ्या मी मनाचे कसे काय सांगू
सुखाची न लागो नजर हाय देवा
किती दुःखही देखणे काय सांगू
तुझे नाव प्रत्येक श्वासात माझ्या
हवे ते समज वेगळे काय सांगू
३.
वाटते प्रत्येक इथल्या माणसाला
मी कधी कळलोच नाही या जगाला
आजही पोरास तो बिलगून रडला
आजही सदरा विकत घेता न आला
एक मन म्हणते तुला विसरून जावे
एक म्हणते एवढी घाई कशाला
राम भिजतो,जॉन अन् जावेद भिजतो
धर्म किंवा जात नसते पावसाला
एवढा करतोस तू त्रागा कशाला
एक अल्लड सावली म्हणते उन्हाला
No comments:
Post a Comment