१.
जखमा अशा अघोरी करतात लोक का हे?
पाण्याविना तळ्याशी मरतात लोक का हे?
वारे सुगंध घेउन येतात रोज दारी
दुर्गंध पण उरी तो भरतात लोक का हे?
जेव्हा लढावयाची येते जबाबदारी
मागे,अजून मागे सरतात लोक का हे?
दारात स्थान नव्हते ह्यांना कधीच ज्यांच्या
त्यांच्या घरीच पाणी भरतात लोक का हे?
मस्तीत भोगण्याच्या दुर्लक्षितात तारे
आभाळ फाटल्यावर स्मरतात लोक का हे?
त्या मंद सांज-वाती,हलती जरी शरीरी
जालीम भोग-तृष्णा,वरतात लोक का हे?
स्पर्धा विनाशकारी,जिंकून शेवटी पण
जगण्यात रोजच्या ह्या हरतात लोक का हे?
वाटेस ना कुणाच्या,केवळ 'अशांत' हा मी
माझ्याविरुद्ध तो डुख,धरतात लोक का हे?
२.
अस्वस्थ अंतराला मी शांतवू कशाने?
आतील संगराला मी थांबवू कशाने?
आताच काढली मी समजूत ह्या व्यथांची
अन् आज घाव माझा मी थोपवू कशाने?
जगण्यात दर्द पेरुन ते नाचती खुशीने
बेफाम माज त्यांचा मी उतरवू कशाने?
आता कुठे मनाला ठेवावयास जावे?
हकनाक जीव जाती, मी वाचवू कशाने?
शब्दांत साखरेची पोती अमाप त्यांच्या
पण वागण्यात जहरी, मी संपवू कशाने?
कळते मला जगावे, जगणे मनात रुजवुन
जगण्यास दंश त्यांचे मी घालवू कशाने?
घासांसवे सुखाच्या, मी अश्रु पीत असतो
बेचैन श्वास माझे, मी दाखवू कशाने?
३.
येथील माणसांना कळलो अजून नाही
माझे भले कराया वळलो अजून नाही
माझ्या शिरीच ओझे माझ्या कलेवराचे
चालून पाय झिजले,गळलो अजून नाही
वारे उगाच मजला देतात हाक बेटे
त्यांना कवेत घ्याया ढळलो अजून नाही
त्यांनी तसे कितीदा कळपात बोलवीले
पाऊल वाकले पण चळलो अजून नाही
आतील झाकण्याला भरदार रंग येथे
'रंगांत' येथल्या मी मळलो अजून नाही
माझ्या तना-मनाचे त्यांच्या चुलीत इंधन
अग्नीमधे असूनी जळलो अजून नाही
...............................
विनय मिरासे 'अशांत'
९४२०३६८२७२
No comments:
Post a Comment