तीन गझला : संजय तिडके

 



१.

गोड करूया मिळून दोघे दिवस आजचा
नकोस काढू उगीच आता विषय कालचा

अंतर नाही जास्त तसेही दोघांमध्ये
डाव कधीही पलटू शकतो हारजीतचा

कडुलिंबाला गोड घातले पाणी सुद्धा
गेला नाही कडूपणा हा तरी अंगचा

किती मोडली दुष्काळाने कंबर त्यांची
उठला नाही सावकार पण दारावरचा

शोधत आहे अजून उत्तर मेंदू माझा
पुढे सश्याच्या गेला कासव कसा मागचा

चुकतो ठोका हृदयाचा या नक्की तेव्हा
विषय काढता मध्येच तिने घरी जायचा

जळत असावी पणतीसुद्धा विचारात या
दूर करावा अंधार कसा तिच्याखालचा

घाबरली ती घरी जायला जरा उशीरा
परिसर नव्हता नवा जरीही आसपासचा

नकोस मागू वचन कुणाला चुकून सुद्धा
जागत नाही माणूस कुणी  आजकालचा

२.

चष्मा जुनाट माझा बदलून घेतला
संशय किती स्वतःवर माझा बळावला

टिकवायचे तुला जर अस्तित्व आपले
पडले तिथेच घ्यावे शिकुनी रुजायला

त्यानेच जात माझी खोदून काढली
समजून वागलो मी माणूस आपला

केला प्रयत्न खुपदा विसरून जायचा
सलतो मनात अजुनी काटा फुलातला

होईल घर सुगंधी तुमचे तिच्यामुळे
अवकाश द्या मुलीला थोडा फुलायला

त्याला कसा म्हणावा माणूस आपला
माणूस माणसाशी बघतो लढायला

माझ्या मनातले पण ऐकून घे जरा
जग लागले मलाही थोडे कळायला

विश्वास पाहिजे बस दोघात तेवढा
नाही मुहूर्त लागत नाते जुळायला

आधार सावलीचा दे तेवढा तुझ्या
नाही कधीच मागत हिस्सा सुखातला

कीर्ती बघून माझी भलते जळू नका
आयुष्य खर्च केले इतके शिकायला

नसते कुणी कुणाचे लक्षात ठेव तू
घे घोर संकटाशी शिकुनी लढायला

३.

जीवनाची घडी उकल माझी
कूस देवा जरा बदल माझी

चूक पोटात घालते म्हणुनी
वाढते रोजची मजल माझी

मान्य केला गुन्हा स्वतः मी अन्
चाल झाली नवी सफल माझी

देह माझा जसा झिजत गेला
होत गेली कमी दखल माझी

आवडीचा विषय तुझा नव्हता
वाचली का तरी गझल माझी?

.................................
संजय बाबुराव तिडके
अहमदपूर जि.लातूर
मो.न. 9403504940

No comments:

Post a Comment