दोन गझला : विनोद गहाणे

 



१.


उत्तरे मी शोधली पण प्रश्न होते आतले

मी भुकेच्या वेदनेने का शहर हे गाठले


शांततेची कार्यशाळा काल ज्याने घेतली

दंगलीच्या केंद्रस्थानी नाव त्याने कोरले


दाबलेल्या आतड्यातुन भूक जेव्हा जन्मली

शेवटी गझलेतुनी आयुष्य माझे मांडले


केवढा संताप केला सावलीवरती उभ्या

मज कळेना का उन्हाचे वय अचानक वाढले


संकटे मी ठेचुनी वेशीवरी आलो जसा

औक्षणाला येत आहे हे सुखांचे दाखले


कोणते फळ नेमके देईल आता आसरा

त्या विचारांच्या भितीने झाड सारे वाकले


२.


तू दिले मजला चुकांचे दाखले

मग चुकांना पांघरावे लागले


तृप्त व्हावा या धरेचा देह जणु

मी नभाला नख जरासे टोचले


गझलियत शेरात येण्या आगळी

दुःख माझ्या भोवताली ठेवले


कोणत्या कळपात मी दिसणार ना

कायदे हे बा भिमाचे पाळले


संकटाचा पाहुनी तू पिंजरा

पंख का मग तू स्वतःचे छाटले


मी तसा लढणार होतो जीवना

पण जगाने कान माझे फुंकले


No comments:

Post a Comment