१.
काळ बदलला मने बदलली हृदयी नाही ओल
चलन कागदी ठरते वजनी नाती सडली खोल
कैक काढती घुसळुन पाणी मिळते लोणी तरी
सडक आमुची तरी भरावा लागतो कसा टोल ?
महिमा जगती घुमतो कानी वचन पालनाचाच
टगे सकलही ठरुन शिरजोर वचने होती फोल
मती संतुलित हवी नेहमी ज्ञानी सांगति जगी
समज संपता कानी पडती सकल पोपटी बोल
समस्त पळती उरी फुटेतो मिळवीण्या भाकरी
मरणापेक्षा सरण महाग जिवाला कुठले मोल ?
नसे पायी कुणाच्याच पायपोस कुणाचा नीट
रणांगणी ना फसायचे दुनिया असते रे गोल
आपण कठपुतळे ते नियती घरचे सांगे कुणी
जीवन असते नाटक अपुला नेटका करा रोल
पद टाकावा सदा ओळखुनि निसरडी ती जमीन
मिळता यश पाय हवा जमिनीवरी सावरुन तोल.
२.
कळले नाही पाठीवरती किती ते वार होते
लुटण्यासाठी दावू तयार कोणते यार होते ?
चरत राहती सदा सर्वदा गोणी भरण्या ढेरी
पशू म्हणावे तया तर पाय कुठे ते चार होते ?
गोंडा घोळत असतात सदा भाट सभोती सारे
मदतीस धावताना का पडले थंड गार होते ?
बोलाचा तो भात वाढती, बोलाची थंड कढी
दीनांसाठी सताड उघडे कुणाचे दार होते ?
कितीक जगती बापाच्या रे कमाईवरी ऐदी
एकजात सर्व खात्या भुई खरोखर भार होते
कुजबुजता का पाठीमागे कळत आम्हास नाही ?
चार लोकांत वागणे तरी ते आरपार होते
होते बळजोरी रात्रंदिन दुबळ्यांवरती रोजी
मन माझे रे त्यांच्यासाठी लगोलग घार होते
३.
चिंता करता आमुची उगा कशाला?
जमवावी पुडकी नोटांची उशाला
घोष लोकसेवेचा अविरत लावता
प्यावी मदिरा पडता कोरड घशाला
भिडू लागतीच जयजयकार घोकण्या
घडविण्या भाट-चारण काढा प्रशाला
माय काढी उपास भरवण्या वारसा
पुजावा कसा पोळ्यात बैल बशाला?
काढा सेल्फी कुणी नदीत बुडताना
व्हा हजर झणी बाराव्याच्या रशाला
फोडा गुपिते मिळता दारू बाटली
पुजा खेटराने भर सभेत अशाला
असते सोपे नमवणे खटा धटांना
ऑपरेशन नकोच सर्दी पडशाला
.........................................
सदानंद पुंडपाळ
११०२, नक्षत्र को ऑप. हौसिंग सोसायटी, नानाभाई परळकर रोड, परेल व्हिलेज, परेल (पू),
मुंबई ४०००१२
मो.९४०४९६८८२९
No comments:
Post a Comment