१.
चेहऱ्याआडच्या चेहऱ्यासारखे
रंग दुनिये तुझे पाहण्यासारखे
काय उपयोग ह्या शर्यतीचा तरी
मूल्य अवघे जिथे संपल्यासारखे
वॉलला तू कमेंटत रहा स्मायली
त्यामुळे वाटते भेटल्यासारखे
चल नवा ग्रह बघू सूर्यमालेमधे
काय उरले इथे राहण्यासारखे
संचिताच्या रकान्यात नव्हतीस तू
सत्य होते किती...झोंबण्यासारखे
अर्थ मौनामधे राहिला आपला
शब्द नव्हते जवळ बोलण्यासारखे
एक मी जीवना नाव घेऊ कसे
भोग सारे तुझे भोगण्यासारखे
२.
जगाशी वागताना हा गुन्हा केला खरोखर मी
चुकीला चूक म्हटले अन् बरोबरला बरोबर मी
जरासे वेगळे काही कराया पाहिले जेव्हा
कळेना ओढल्या गेलो कसा मागे भराभर मी
कधी सृष्टीतला इवला अणू होऊन वसतो अन्
कधी व्यापूनही उरतो इथे अवघे चराचर मी
कशाला दावता भीती मला उन्मत्त लाटांची
विजा कोळून प्यालेला जगज्जेता सिकंदर मी
जुने बाजूस ग्रह करुनी कधी तू भेट ना सखये
तुला सांगेन माझ्याही मनामधले सविस्तर मी
भले दुर्लक्षुनी किंवा भलेही टाळुनी मारा
तरी स्पर्धेमधे तुमच्या उभा आहे कलंदर मी
मला शोधू नको आता नव्या कँलेंडरामध्ये
तुझ्या केवळ स्मृतींमधला जुना आहे डिसेंबर मी
३.
का असे घडते तुला कळणार नाही
जीव कोठेही पुन्हा जडणार नाही
बोल तू बोलायचे जे आज...आत्ता
यापुढे मी मोकळा असणार नाही
पापणी रोखेन अश्रू एक हळवा
हुंदका पण दाबणे जमणार नाही
धग तुलाही जाणवत राहीन वेडे
मीच काही एकटा जळणार नाही
आठवण माझी तुला येईन जेव्हा
खातरी देऊ कशी सलणार नाही
एकदाची वेदना जाईलसुद्धा
घाव तर केव्हाच हा भरणार नाही
गोष्ट अपुली याचसाठी मांडली की
वाटते आहे पुढे...स्मरणार नाही
.......................................
दिगंबर खडसे
अकोट , जि.अकोला
No comments:
Post a Comment