तीन गझला : शीतल कर्णेवार

 



१.


फुलते ज्याच्या दारामध्ये जाई

त्या बापाचे दुःख वेगळे नाही


बिनस्वार्थाने देणे-घेणे नाही

कुणावाचुनी अडते काहो काही


सुटून जाते मिठी गुलाबी जेंव्हा

अंगांगाची होते लाही लाही


घर दुःखाचे नदीकिनारी बांधा 

लपे खुबीने अश्रूंचीही शाई


नकळत म्हणतो कळले सारे त्याला

क्षणात एका कळते का हो बाई


माय रुक्मिणी,बाप जाहला विठ्ठल

विश्व मनाचे वसते त्यांच्या ठायी


कुंपणानेच वावर खाल्ले म्हणुनी

अता फारशी बोलत नाही आई


प्रेमात असे घडते भलते काही

भान तुला ना मला जगाचे राही        


२.


भाळावर मी गोंदुन घेते कोरे कोंदण

आले नाही कधीच नशिबी हिरवे श्रावण


जगात येथे बापासमान कुणीच नसतो

संस्काराचे बीज पेरतो होउन अंजन


हजार गाड्या  दारात उभ्या  असे तरी पण

तुझ्याविना बघ घरास नसते बाई घरपण


जीवनातल्या तडजोडीच्या गाठी बघता

हळूच हसते हातांमधले फुटके काकण


या देहाचे होते नुसते     अत्तर अत्तर

सोबत माझ्या तू असण्याचे असेल कारण


पांघरल्या मी झळा उन्हाच्या शीतल देही

आता मजला नको सावली आंदण बिंदण


३.


पारावरती हळूच हसली एक बाभळी 

तशी उजळली आयुष्याची कथा सावळी


धुमसत गेली आग आतली द्वेषाची अन्

साचत गेली मनपटलावर पुन्हा काजळी


कष्टाने मी ध्येयावरती नजर रोखता

गर्दीमधुनी भेटत गेली दिशा आगळी


गजऱ्यालाही कळती सारे रुसवे-फुगवे

तुला न कळली दरवळलेली एक पाकळी


नको एवढा सौंदर्यावर माज दाखवू

होशिल येथे देहामधुनी तुही मोकळी


.................................

शितल कर्णेवार

देवाडा

No comments:

Post a Comment