दोन गझला : बदीऊज्जमा बिराजदार

 



१.


मनातल्या मनात मी हासतो कधी कधी

तुझाच उष्ण श्वास हा भाजतो कधी कधी


फुलारल्या सुखातला चेतवीत गारवा

नभातल्या तळ्यात मी डुंबतो कधी कधी


मला नकोच साद घालू उगाच तू नभा

उदास चंद्र चांदणे पाहतो कधी कधी


जपून अंतरी गडे ठेवले फुलास मी

अजून गंध त्यातला हुंगतो कधी कधी


सखे तुझीच याद ही येतसे अधीमधी

भकास खिन्न आसवे ढाळतो कधी कधी


खुदास काय मागतो साबिरास ना कळे

मलाच वेड लागले, मानतो कधी कधी


२.


जिंकण्याची जिद्द होती, हारणारा डाव होता

जे पुढे घडणार त्याचा जीवघेणा घाव होता


मागतो प्रत्येक वेळी त्याच न्यायाचा निवाडा

थांबला संघर्ष कोठे?चोर ऐसा साव होता


देह नाही थोर आत्मा माणसाच्या जीवनी या

जाण ही माणूसकीची रीत ज्याला भाव होता


पाठलागी मृगजळाच्या तोल गेला पावलांचा

मांडताना सत्य माझे अंतरीचा ताव होता


काय दोषारोप लावू या जगाला मानभावी

मौज संसारी रथाचा अश्व भरधाव होता


ऐक साबिर जीवनाची ना कधी मी खंत केली

अर्पिले हे शब्द ज्याला,तूच तेव्हा ठाव होता


................................

बदीऊज्जमा बिराजदार

(साबिर सोलापुरी)

2 comments:

  1. व्वा. क्या बात है. दोन्ही गझला अप्रतिम.

    ReplyDelete
  2. खूप छान गझला सरजी, दोन्ही गझला खूप आवडल्या !
    मनःपूर्वक अभिनंदन सर!

    ReplyDelete