तीन गझला : केदार पाटणकर

 



१.


विसावा आणखी कोठे मनाने घेतला नाही

तुझ्यावाचून कुठलाही निवारा भावला नाही


बघितले संशयाने या जगाने नेहमी येथे

इरादा शुद्घ मैत्रीचा कुणीही जाणला नाही


न जगले रोप तुळशीचे, न फुलला मोगरा येथे

तुझा पाऊस दाराशी कधीही थांबला नाही


जिला बोलावले होते, कधी आलीच नाही ती

पलंगावर कुणी नाही, विडाही रंगला नाही


बरे झाले, मुले निजली कहाणी संपण्यापूर्वी

नको तो प्रश्न ओठांवर कुणीही आणला नाही


२.


चांदण्यात मी भिजून जायचो

गीत एक गुणगुणून जायचो


स्वप्न मस्त मस्त होत जायचे

मी तुझ्या घरावरून जायचो


ओळ देखणी तयार व्हायची

कागदावरी लिहून जायचो


नाव काढता तुझे पुन्हा पुन्हा

मोहरून मोहरून जायचो


मी तुझ्यासवे फुलून यायचो

मी तुझ्याविना मिटून जायचो


३.


नव्हता जरी कागद तरी लिहिली

प्रीती तुझ्या गालावरी लिहिली


शंका हजारो काढल्या गेल्या

माझी कथा मी तर खरी लिहिली


कविता तुझ्यावरच्या बऱ्या नव्हत्या

पत्रे तुला नक्की बरी लिहिली


कवितेमधे ती मावली नाही

मग, मी तिची कादंबरी लिहिली


ताटात माझ्या पंचपक्वान्ने

नशिबात त्यांच्या भाकरी लिहिली


No comments:

Post a Comment