तीन गझला : किशोर बुजाडे

 


१.


गेली तहान धावत विहिरीतल्या तळाशी
दिसली तशीच तेथे कोरड तिच्या घशाशी

बहुतेक मेजवानी येणार आज हाती
नांगर चिरे भुईला,बगळा उभा उपाशी

माझेच श्वास जेव्हा माझ्या विरुद्ध गेले
सांगा कसे लढू मी बाहेरच्या जगाशी

पाणी हवा नि विस्तव माझेच अंश सारे
मातीत पाय माझे डोळे सदा नभाशी

शेरास शेर येथे आहेत मीर गालिब
कासव म्हणू कुणाला तुलना नको सशाशी

गझले तुझ्यात भिनला आहे किशोर इतका
जुळला रदीफ आता आजन्म काफियाशी

२.

शेतकऱ्याच्या घरात तेव्हा दाणे होते
जात्यावरती दळणासोबत गाणे होते

गवती छप्पर,गाय,वासरू, अंगण,चिमणी
घरी थव्यांचे तेव्हा येणे -जाणे  होते

फक्त दिसे ती पूरणपोळी सणवाराला
बाकी दिवशी चटणी -भाकर खाणे होते

भेसळ नव्हती शंका नव्हती नव्हती चिंता
दर कोसावर त्या तेलाचे घाणे होते

दुनियेच्याही आनंदाला विकत घ्यायचो
इतके किमती तेव्हाचे चाराणे होते

सूर मारुनी थाक तळाचा काढत होतो
देहासोबत रोज मनाचे  न्हाणे  होते

३.

रानात पाखरांच्या हृदयी थरार राजा
कोणी भकास केले सांगा शिवार राजा

सत्ता असो कुणाची नाही बळीस वाली
जो तो लुटून नेतो होतो फरार राजा

बेताल बोलण्याने नावारुपास आला
शब्दात रोज येतो त्याच्या विखार राजा

विश्वास ठेवला अन् तेथेच घात झाला
याचेच दुःख आता छळते अपार राजा

आश्वासने किती हे देतात राज्यकर्ते
ऐकून थक्क झालो खोटा प्रचार राजा

पायास ठोकरीने केले अता शहाणे
फोडून अंगठा मी झालो हुशार राजा

म्हणतात ते असे की झाकून सूर्य ठेवू
रात्रीच काजव्यांचा झाला करार राजा.

.................................
किशोर बुजाडे
8459965305

1 comment:

  1. व्वा. क्या बात है. तीनही गझला अप्रतिम.

    ReplyDelete