तीन गझला : विनोद सावंत

 



१.


लाघवी बोललो, चूक झाली

चांगले वागलो, चूक झाली!


एकदा दोनदा ठीक होते

खूपदा माजलो, चूक झाली!


चालण्याची गरज लागल्यावर

नेमका थांबलो, चूक झाली!


माणसांच्यामधे देव नव्हता

पण तरी वाकलो, चूक झाली!


जाणल्यावर भविष्या तुला मी

भ्यायला लागलो, चूक झाली !


२.


वाहत भले असू दे उलट्या दिशेस वारे

घे तू पुन्हा भरारी तोडून पाश सारे


सांगून काय गेला पाऊस आज पहिला

समजून घे जरा तू मौनातले इशारे


बोलावले मला अन् बोलू दिलेच नाही

सत्कार खास माझा झाला अशाप्रकारे


ठेवू कशास नावे इतकी कुणात हिंमत

खातात वाढलेले नवरे गुणी बिचारे


भिजतेस तू तिथे अन् वेडावतो इथे मी

शांतावण्यास ये ना हृदयातले निखारे


कळले कुठे तुम्हाला दोघांत काय आहे

लावा किती कसेही तुमचे तुम्ही पहारे


आता कसे मिटावे दोघांमधील अंतर?

दोघे धरून बसले आपापले किनारे


३.


वेगळ्या या वागण्याचा अर्थ आता लागला

ऐकला आहेस तू आवाज बहुधा आतला!


नीट पारख व्हायच्याआधीच ठरते योग्यता

कोण बघते, कोणता माणूस आहे चांगला?


पूर्वजांनी ठेवले जे टाकले मी ते विकुन

छानसा शहरामधे मग बंगला मी बांधला


नीट सारे चाललेले आपल्या दोघांत जर

वाद का मग वाढला हा आपल्या दोघांतला?


सर्वजण गेले पुढे अन् मीच मागे राहिलो

आवडीचा बाक होता मागच्या रांगेतला


हे कुठे आलोत आपण कोणते आहे शहर?

चेहरा इथल्या घरांचा ओळखीचा वाटला


दुःख माझे पांडुरंगाला कधी मी बोललो?

तो कुठे आहे रिकामा बोलणे ऐकायला


No comments:

Post a Comment