तीन गझला : पंकजकुमार ठोंबरे

 



१.

जगाच्या नाटकामध्ये सुखी दिसणे विसरलो मी
मुखवट्याआड जगताना खरे जगणे विसरलो मी

जळालो पार इतका की तुझ्या वणव्यात आयुष्या
सुरू पाऊस धारांचा तरी विझणे विसरलो मी

उन्हाची वाळवंटांची सवय झाली मनालाही
नको छेडूस घावांना अता रडणे विसरलो मी

सुनामी लाट आल्यावर कुठे वाहून आलो मी
नको मारूस आरोळी परत फिरणे विसरलो मी

तुला शोधून आलो मी पहाडावर किनाऱ्यावर
तुझ्याशी वैर झाल्यावर तुझे नसणे विसरलो मी

२.

आघात तू विजांचे झेलून घे मना
प्रेमात वादळांशी खेळून  घे मना

कंठात आज आला दाटून हुंदका
धरणास आसवांच्या बांधून घे मना

गेलीत माणसांना सोडून माणसे
एकांत वेदनांनी सजवून घे मना

जिंकूनही लढाई हरलोच मी कसा
झालेय राजकारण समजून घे मना

मारून कोण गेले शत्रूविना मला
मित्रांत एक शत्रू मोजून घे मना

प्रेमात काय माझा झाला सखी गुन्हा
शिक्षा उगाच झाली भोगून घे मना

कष्टात राबताना उपवास का मला
झाले महाग जीवन जाणून घे मना

खेळून भावनांशी हसतात लोक का
ही रीत या जगाची रुजवून घे मना

झाला उठाव मोठा मौनात एकदा
आताच तू स्वत:ला जिंकून घे मना

३.

खरी तू देवता माझी, मनाच्या अंतरी मित्रा
तुझ्या मैत्रीत झाली रे जिवाची पंढरी मित्रा

नको पैसा मला मोठा नको स्वर्गात जागाही
तुझ्या वाट्यातली अर्धी मला दे भाकरी मित्रा

विसरलो दु:ख मी सारे तुला पाहून शेजारी
तुझ्या शब्दांतली जादू सुरांची बासरी मित्रा

खरा दसरा,खरा पोळा, खरा तू रंग होळीचा
खरी दोघांत झाली रे दिवाळी साजरी मित्रा

तुझ्या शहरात आता तू ,इथे गावात आहे मी
तुझ्यावाचून एकाकी वडाची ओसरी मित्रा

.................................
पंकजकुमार उत्तम ठोंबरे
कोंडोली, ता. मानोरा जिल्हा वाशिम
9503717255

No comments:

Post a Comment