१.
हिसडून दावणीला पळते जसे जनावर
मन सैरभैर माझे फिरते तसे अनावर
अपघात,खून, दंगे घडतात रोज इतके
कोणीच घेत नाही ते फारसे मनावर
उत्पादनास नाही कुठलीच आडकाठी
शर्ती हजार लागू मद्यार्क सेवनावर
सुकतील फार लवकर जखमा जरी तनाच्या
भरणार घाव कैसे झालेत जे मनावर?
निर्भीक बोलण्याची आहे इथे मनाई
धरबंध मात्र नाही बेताल भाषणावर
२.
चौखूर धावणारे,मन हे असे विकारी
शंकरपटात धावे, जोडी जशी खिलारी
ही जीभ माणसाची,तलवार की दुधारी?
पियुषाहुनी मधुर अन् सापाहुनी विषारी!
जे जे मिळेल त्याला, वाटे सदा अपूरे
ही हाव माणसाला, करते अशी भिकारी
मृत्यू दबा धरोनी, बसतो अशा ठिकाणी
शोधात सावजाच्या,असतो जसा शिकारी
देशात राजकारण, सडलेय आज इतके
घाणीसही कदाचित,यावी अता शिसारी
.................................
©देवदत्त संगेप
63,एसबीआय कॉलोनी,
गोपालनगर, नागपूर - 440022
संपर्क :9923488611
खूप सुंदर आहेत दोन्ही गझला ❤️❤️❤️👏👏👏
ReplyDeleteखूप छान सर, दोन्ही गझला आवडल्या!
ReplyDeleteमनःपूर्वक अभिनंदन!
खूप छान सर...👌👌👌
ReplyDelete