१.
तुझे स्वप्न जागेपणी खास आहे
जुना ध्यास या प्रेमपर्वास आहे
कधी श्याम म्हणते कधी कृष्ण,कान्हा
तुझे नाव माझा जणू श्वास आहे
फुलाला कसे काय नाकारते मी ?
अरे काळजाशी तुझा वास आहे
जरी मी न राधा नसे गोपिकाही
तरी रंगलेला इथे रास आहे
मला मोह नाही मुळी लौकिकाचा
किती हा सुखाचाच सहवास आहे
कुण्या कारणाने अशी धीट झाले
तुझे प्रेम साक्षात मधुमास आहे
अशा चांदराती तुला हाक देते
नभी शुक्रतारा पुराव्यास आहे
२.
अता वाटे खरेतर हे जगा माहीत होते
कशाला मी उगाचच लपविले का भीत होते
गझल अद्यापही ज्यांची मना वेढून आहे
कळाले नाव ते चित्रासहित जगजीत होते
मला आल्या पुन्हा हाका दिशा दाही उजळल्या
तुला सांगू कसे हे काय धुंडाळीत होते
अशी आहे नशा जगण्यात गझलेचीच सारी
थवे आजन्म शब्दांचेच कुरवाळीत होते
फुले वाट्यास आलेली जरी बेरंग होती
तरीही क्षण सुखाचे पूर्ण गंधाळीत होते
३.
आज आला अंगणी हा धुंद श्रावण
वेड लावी साजणी हा धुंद श्रावण
पैठणीचा रंग माझ्या खास होता
भासला की बैंगणी हा धुंद श्रावण
अंग माझे चिंब भिजले पावसाने
पाहिला मी दर्पणी हा धुंद श्रावण
साजणाची याद आली चांदरात्री
पौर्णिमेच्या पैंजणी हा धुंद श्रावण
नाचताना तोल गेला ऐनवेळी
काच फुटता कांकणी हा धुंद श्रावण
नीज आली सूर्य येता तावदानी
घेत आहे चाचणी हा धुंद श्रावण
रात्रभर मी जागले त्याच्याचसाठी
आज झाला पापणी हा धुंद श्रावण
.................................
प्रभा सोनवणे
मो.9270729503 Sonawane.prabha@gmail.com
अप्रतिम ग़ज़ल-अभिनंदन
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
Deleteधन्यवाद भाईसाब!🙏
Deleteधन्यवाद भाईसाब 🙏
Deleteखुपच सुंदर , आपले शब्द समर्थ असतात...
ReplyDeleteविगसा.💐💐💐💐💐
धन्यवाद सातपुते सर🙏
ReplyDeleteगझल मनाला व्याकूळ करते
ReplyDeleteमनातले ती दुःख मांडते
कधी आनंदाच्या डोही डुंबते
उत्श्रुंखलता अवचित करते
गझलकार तु चंदाराणी
स्वतःच तु मज गझल भासते
धन्यवाद सुभाष ! खूप सुंदर कमेंट 💕
ReplyDelete