तीन गझला : सौ. रेखा तांबे

 


१.


विश्वासले जिथे मी, ते लोकही पलटले

जन पारखून घेणे, या जीवनी न जमले


जाणून वेदनांना, घ्यावे जरा जगाच्या

का वागण्यात कोणी, माणूसकी विसरले


स्पर्धेमधे जगाच्या, जगण्यास वेळ नाही

जिंकून घ्यायला ती,

सगळे कसे अडकले


स्वार्थी जगात येथे, नाही कुणी कुणाचा

मदतीस धावणारे, स्वार्थात  

दूर सरले


सोडू नकोस आशा, तू चाल ध्येयमार्गी

कष्टामुळे यशाचे,बघ द्वारही उघडले 


२.


मज आठवती त्या रात्रीचे दोघांचे क्षण फुललेले

अधरांवरती ओठ तुझे अन् डोळे माझे मिटलेले


मिटल्या नयनी तरंगते मी स्वप्नांवरती तुझ्यासवे

अवतीभवती तुझे गुंजती शब्द मधाने भरलेले


वाटे अलगद विरून जावे विरोध येथे सर्वांचे

सुंदर माझे घरटे राहो सुखस्वप्नांनी सजलेले


साद घालते घर हे माझे भाव मनाचे जपणारे

गंधित वारा सदा ठेवतो नाते अमुचे खुललेले


कसे असावे जीवन अपुले विचार करते कधीकधी

दुसऱ्यांसाठी सदा झटावे त्यांस पहावे हसलेले 


३.


माणसा शोधतो फार देवास का ?

त्यास मूर्तीत शोधून उपहास का ?


दुर्जनांचा असे बोलबाला अती

सज्जनांच्या नशीबात वनवास का ?


शब्द असतात ठेवा जणू ईश्वरी

तेच होतात काटे असा ऱ्हास का ?


प्रेम जर मानतो श्रेष्ठ सर्वात तर

वाटतो फक्त पैसाच हा खास का ?


पाहते अन्न वाया किती जातसे

लागली भूक त्यांना नसे घास का ?


चोर सोडून का सत्यवादी फसे

चूक केलीच नाही तरी फास का ?


जीर्ण केला जिने देह सारा तुझा

तीच दारू बनवते तुला दास का?


.................................

सौ. रेखा तांबे

वडोदरा

2 comments: