तीन गझला : मारोती आरेवार

 



१.


कधी मौन घेतो कधी बोलतो मी

जशी वेळ येते तसे वागतो मी


स्वतःलाच जाळे स्वतः टाकले मी

सुटेनाच गुंता असा गुंततो मी


तिची याद येता मला सावराया

सुगंधी क्षणांना पुन्हा चाळतो मी


सुखाने भिजव मज कधी जीवना तू

झळा वेदनेच्या सदा सोसतो मी


नव्याने जगाया इथे लागलो मी

चुका मागच्या त्या अता टाळतो मी


२.


चहूकडे दरवळेन म्हणतो

फुलांप्रमाणे जगेन म्हणतो


मनी लबाडी हवी कशाला

इमान माझे जपेन म्हणतो


भकास झाले शहर असेही

कसून शेती करेन म्हणतो


नको दुरावा कधीच ठेवू

तुझ्याच हृदयी वसेन म्हणतो


कहर किती हा नराधमांचा 

घरास माझ्या जपेन म्हणतो


तमात बुडतो समाज जेव्हा,

उजेड देण्या जळेन म्हणतो


गझल मला जर खुळा बनवते 

तिचा दिवाना बनेन म्हणतो




३.


प्रयास माझा जगण्यासाठी

घरास माझ्या जपण्यासाठी


दवा कोणती आहे का हो 

दुःखामध्ये हसण्यासाठी


पुन:पुन्हा ती फिरून येते

तिची आठवण छळण्यासाठी 


नकाच लादू ओझे तिजवर 

तिला वेळ द्या सजण्यासाठी


तिचे रितेपण  छळते आहे

हवीच होती लढण्यासाठी


जगापासुनी शिकून घे तू 

बरेच आहे शिकण्यासाठी


प्रत्येकाने समोर यावे 

माणुसकी वाचवण्यासाठी 


................................

मारोती आरेवार

गडचिरोली

9403239435

2 comments:

  1. फारच सुंदर !!!
    कधी मौन धरतो...

    ReplyDelete