तीन गझला : अमोल गोंडचवर

 



१.


कितीवेळा पिलांसाठी किती लांबून आली तू

उभा डोंगर,किनारा अन् नदी लांघून आली तू


तुला कष्टात जगण्याचे दिले वरदान देवाने

उपाशी बाळ फांदीला सदा टांगून आली तू


उपेक्षा नेहमी पदरी तरी खचली कधी नाही,

उजेडाची दिशा दावू असे ठरवून आली तू


खरे दुःखास मानावे सुखाचे दार सर्वांनी,

जगा आनंद देताना जगा सांगून आली तू


तुझे आयुष्य मंतरतो असा धागा कसा मांत्रिक

तरी अनमोल नाते या जगी बांधून आली तू


२.


दाट काळोख दिसतो दिव्याभोवती

एवढा गुंतला तू स्वतःभोवती


पंख फुटले मला,घेतली झेप मी

पण तरी चित्त माझे घराभोवती


लेकरू मागते बाहुली एक,पण

हात रेंगाळतो का खिशाभोवती?


शेवटी हेच जग, मान्य केले तिने 

मारते सात फेरे वडाभोवती


मोजके श्वास आहेत उरले तरी

सारखे हिंडते मन तिच्याभोवती


पाखरांचा किलबिलाट नाही सुरू 

थांबले गोड गुंजन खळ्याभोवती


एकटा सूर्य बहुतेक जगला इथे

ओळखीचा कुणी ना मढ्याभोवती


३.


कोण आहे कसा,ओळखावा कसा?

माणसाचा खऱ्या शोध घ्यावा कसा?


लांच्छने लागली सोहळ्याला किती

कोणता सोहळा आवडावा कसा?


सोडले ना कधी चांगले वागणे

आज वाईट रस्ता धरावा कसा?


मी धरा,गाव आभाळ आहे तुझे,

भेटण्याचा कुठे योग यावा कसा?


काजव्यांनो बढाया जरा थांबवा

काजव्यांचा कधी सूर्य व्हावा कसा?


कापडांसारखी माणसे बदलतो

एकटा तूच निस्सीम दावा कसा?


ओळखीचे किती चेहरे भोवती

घात केला कुणी मग कळावा कसा?


छान हिरवळ दिसे या जगाला जरी

दाखवू आतला तप्त लाव्हा कसा?


.................................

अमोल गोंडचवर,

केशव नगर, अकोला

8275311996

1 comment: