१.
जेव्हा भलेपणाची बंडी उलार झाली
दुःखी तनामनाची बंडी उलार झाली
बोलून फार गेले आले कुणी न कामी
माझ्या मुक्यामनाची बंडी उलार झाली
धोका म्हणू कुणाचा सरकार पावसाचा
नुसत्याच गर्जनाची बंडी उलार झाली
सोसून गप्प बसले प्रतिकार मौन झाले
बहुधा जितेपणाची बंडी उलार झाली
जगलो कुठे खरा मी आता जगून घेतो
तोवर कलेवराची बंडी उलार झाली
२.
समृद्ध देश झाला, वा वा म्हणा गडे हो !
विश्वात बोलबाला, वा वा म्हणा गडे हो !
चिरफाड धोरणाची करणार काल होता
केले शहीद त्याला, वा वा म्हणा गडे हो !
अधिकार मागणारे ठरवून देशद्रोही
कारागृहात घाला, वा वा म्हणा गडे हो !
माणूस वाटल्यावर सत्ता हशील होते
नापाक द्या हवाला, वा वा म्हणा गडे हो !
अन्याय सोसण्याचा आहे उपाय नामी
लावा मुखास ताला, वा वा म्हणा गडे हो !
देऊन मान चुकलो आम्ही कसाब-हाती
रडणे उगी कशाला, वा वा म्हणा गडे हो !
स्वर्णीम देश माझा केला भकास ज्यांनी
त्यांच्या घरी उजाला, वा वा म्हणा गडे हो!
३.
वाह्यात बोलण्याचा झाला सुकाळ हल्ली
घ्यावा कुणाकुणावर दररोज आळ हल्ली
ज्यांची जबाबदारी समजून बोलण्याची
त्यांचा विवेक बहुधा असतो गहाळ हल्ली
माथेफिरू असावा बेताल बोलणारा
घातक समाजद्रोही वक्ता कुटाळ हल्ली
साधून बोल जाते रात्रीस राजकारण
मग दिलगिरी मिरवते टेंभा सकाळ हल्ली
प्रश्नास टाळण्याची सत्तेतली कला ही
जनता मुकी बिचारी पिटते कपाळ हल्ली
.................................
डॉ नंदकिशोर दामोधरे
अमरावती
9890911263
No comments:
Post a Comment