तीन गझला : अविनाश काठवटे

 



१.


वाढली केवढी चेंगरा-चेंगरी,

पावलो-पावली चेंगरा-चेंगरी!


एकटे-एकटे शक्य नाही जिणे,

रोजची सोबती चेंगरा-चेंगरी!


कोणती मोकळी वाट होती; गड्या,

कालही, आजही चेंगरा-चेंगरी!


स्वार्थ होता जिथे त्या ठिकाणी खरी,

लागली सार्थकी चेंगरा-चेंगरी!


शोधली खूपदा, भेटली ना कुठे,

आतल्यासारखी चेंगरा-चेंगरी!


आपले सोडुनी जायला लागले,

आणि मंदावली चेंगरा-चेंगरी!


प्राण देहातुनी मुक्त झाला; जिथे,

जाळली शेवटी चेंगरा-चेंगरी!


२. 


लपवतो तर लपवताही येत नाही,

पण; 'तुला' अंदाज काही येत नाही!


कोण माझ्याएवढा लाचार आहे?

'प्रेम आहे', सांगताही येत नाही!


द्यायला देशीलही तू खूप काही,

काय मागू? मागताही येत नाही!


काढतो फोटो तुझ्यासोबत कुणीही,

का तुझ्या तोंडून "नाही" येत नाही?


वाटते; खोडी तुझी काढुन पहावी,

पण तुला तर भांडताही येत नाही!


कळत नाही; दाखवू की राहु देऊ,

एक कविता जाळताही येत नाही!


३.


गझलेमधुनी दुनिया सारी भिजवू शकतो,

मी दु:खावर सुद्धा टाळ्या मिळवू शकतो!


जादू काही औरच माझ्या शाईमध्ये,

मेलेल्या आशेला देखिल जगवू शकतो!


मावळण्याच्या कितीक जखमा उरी घेउनी,

कसून कंबर पुन्हा नव्याने उगवू शकतो!


हसवू शकतो एका शेरामधून केवळ,

एका शेरामधून केवळ रडवू शकतो!


मिसऱ्यांमधल्या नवलाईच्या सारवणाने, 

भेगा पडलेल्या भिंतीही सजवू शकतो!


भरतो पाणी विठ्ठल कायम माझ्यामध्ये,

तहान इथल्या कित्येकांची शमवू शकतो!


केविलवाण्या नजरेने मज नकोस पाहू,

हृदयामध्ये तुझ्या; मैफिली भरवू शकतो!


........................................

अविनाश कृष्णराव काठवटे

छत्रपती संभाजीनगर

9421735884

No comments:

Post a Comment