भेट अथवा सांग वाटा परतण्याच्या शक्यता साऱ्या मिटू दे एकदाच्या !
चमकत्या कळसावरी रोखून नजरा मोजल्या मी पायऱ्या त्या मंदिराच्या
डौल त्यांच्या चालण्याचा वेगळा पण वेगळ्या माझ्या कहाण्या रांगण्याच्या
उंबऱ्यावर पेरले काटे घराने मोगरा आडून हसतो कुंपणाच्या !
ही कथा माझी तुझी नसते कधीही ह्या व्यथा लाखो करोडो काळजाच्या
-ममता सिंधुताई सपकाळ
ममता यांची ही एक सुंदर गझल. यातील पहिलाच शेर वाचकाची वाहवा घेतो. तू मला इथेच भेट. भेटणार नसशील तर वाट पाहून परत जाण्याची वाटही मला माहीत नाही ! कारण येतानाच मी मागल्या वाटा पुसून आले आहे. परतीची वाट दाखवायला तरी तुलाच यावं लागेल ना ! अशा तऱ्हेने कवयित्री अप्रत्यक्षपणे त्याला येण्यास भाग पाडत आहे. उत्कंठतेने वाट पाहणं हा प्रेमाचाच एक पैलू असतो. त्यामुळे या गझलेतील 'ती' आपल्या प्रियकराची वाट पाहत आहे, हा सरळ अर्थ झाला. पण या पहिल्या शेराचा, मतल्याचा, आणखी एक लपलेला अर्थही आहे. हा शेर ईश्वराला / त्या एका ऊर्जेला उद्देशून आहे असं मानलं तर? तर शेराचं सौंदर्य अधिक वाढतं. त्याच्या भेटीसाठी व्याकुळता किती आहे हे दुसऱ्या ओळीवरून कळतं. त्यातील 'एकदाच्या' या शब्दात ती ताकद आहे. तू एकदा भेटलास की इतर साऱ्या शक्यता आपोआप वितळून जातील. तू आहेस की नाहीस; असलास तर तुला तुझ्या भक्तांची पर्वाच नाही, असे तर नाही ना ? आहेस, पण भक्तांमध्ये तू
भेदभाव करतोस का?.... अशा अजूनही कितीतरी शक्यता एकदाच्या संपतील; पण तू आलास तरच
दुसरा शेरही दोन अर्थ सुचवितो. चमकत्या कळसावर नजर रोखून, कवयित्री मंदिराच्या पायऱ्या चढते आहे. मंदिराच्या पायऱ्या पुष्कळ असाव्यात व अवघडही असाव्यात हे सुचविले जात आहे. पण चमकत्या कळसावरून वाटतेय की आतील गाभारा व त्यातील मूर्तीही अत्यंत सुंदर घडलेली असेल. मूर्तीचं रूप व तिचं पावित्र्य, पायऱ्या चढण्याचे सर्व श्रम दूर करेल ! माणूस एखाद्या ध्येयाकडे दृष्टी ठेवून त्याच्या पूर्तीकडे खडतर वाटेवरूनही न थांबता वाटचाल करत असतो. थकत असूनही तो कळसावर नजर ठेवून चढ चढून जात असतो. अंतिमतः पूर्ततेचं समाधान त्या मूर्तीप्रमाणेच आनंद देईल याच हेतूनं तो वर जातो व अपेक्षेप्रमाणे तसं होतंही. एखादा विद्यार्थी डॉक्टर होण्यासाठी असाच खडतर चट पार करत असतो; नाही का? तेव्हा साफल्याच्या कळसावरच त्याची नजर असते.
तिसऱ्या शेरात डौलात चालणे, व रांगणे अशी विरोध दाखवणारी क्रियापदे कवयित्री वापरते. जे समृद्ध असतात, ज्यांच्याजवळ सर्व साधने सहज उपलब्ध असतात, त्यांचा मार्ग नेहमीच सुकर असतो. कुठल्याही अडथळ्याविना त्यांची वाटचाल चालू असते. मग ती चाल डौलदारच वाटते; त्यांचे कौतुकही होते पण वंचितांची वाट एवढी सोपी नसते. ती अडथळ्यांची शर्यत असते. त्यांच्या रस्त्यात खाचाखोचा असतात. तेव्हा प्रगतीपथावर ते मागेच पडणार व रांगण्याच्या गतीनेच त्यांची प्रगती साधणार ही सामाजिक तफावत हा शेर अधोरेखित करतो आहे. गझलेतील शेर अर्थ स्पष्टपणे सांगत नसतो; तो अर्थाकडे फक्त निर्देश करत असतो. हेच गझलेचं सौंदर्य आहे.
चौथ्या शेरात स्त्रीवरील बंधनांवर नेमके बोट ठेवलेले आहे. घरानेच उंबऱ्यावर काटे पेरलेले आहेत व बाहेर फुललेला मोगरा तिला भुरळ घालत आहे. तिच्या घराबाहेर पडण्यावरच बंदी घातली गेलेली आहे. ती बंदी घरातल्याच माणसांनी घातली आहे, हे उघड आहे. मात्र बाहेरील प्रसन्न मोगरा काही ती माळू शकत नाही तिच्या आनंदाच्या गोष्टी तिला करता येत नाहीत व मन मारावे लागते, हा अर्थ शेरातून छान व्यक्त होत आहे. उंबरा, काटे, मोगरा ही सारी प्रतीके कवयित्रीने चपखल वापरली आहेत. शेवटच्या शेरात गझल वाचकाला अधिक उंचीवर घेऊन जाते. सुख कधीच वैश्विक नसतं पण दुःख वैश्विक म्हणजे युनिव्हर्सल असतं, हे एक शाश्वत सत्य कवयित्री दोन ओळीत सांगून जाते या व्यथा लाखो करोडो काळजांच्या असतात, फक्त तुझ्या-माझ्या नव्हेत' ।
या गझलेत पाच शेर आहेत. एकाच गझलेतील शेर एकाच वृत्तात असावेत व प्रत्येक शेरातील विषय वेगळे असले तरी चालतील असे नियम कवयित्रीने व्यवस्थित सांभाळले आहेत. तिने मंजुघोषा हे वृत्त वापरले आहे; ज्यात 'नारनाना' हा अग्नि-गट तीनवेळा येतो. एका गुरु अक्षराऐवजी दोन लघु अक्षरे अशी सूट या पाच शेरात केवळ पाच ठिकाणी घेण्यात आली आहे, हे स्तुत्य आहे. काटेकोरपणे पाहायचे झाल्यास हे वृत्त 'मेघगंगा' असे मानता येईल, जे मंजुघोषाचे मात्रारूप आहे. मेघगंगा हे वृत्त माधव ज्यूलियनांच्या 'छंदोरचनेत नाही; पण 'छंदोमयी कविता- गझल' या माझ्या पुस्तकात ते दिले आहे.
ही माझी आवडती गझल आहे. यात आणखीही काही शेर आहेत व सर्वच चांगले आहेत. कवयित्री ममता सिंधुताई सपकाळ यांचे मनःपूर्वक अभिनंदन !
...........................................
संगीता जोशी
9665095653,
ईमेल - sanjoshi729@gmail.com
No comments:
Post a Comment