तीन गझला : सौ.दिपाली महेश वझे

 



१.


मनास चढले किती आवरण

निसटत गेले सख्या बालपण


वाऱ्यासोबत निघून गेली

फांदीवरती झुले आठवण


निळे,केशरी ठसे उमटले

नभात केले कुणी सारवण 


सरी बरसल्या भर उन्हातही

ऋतूस झाले पुन्हा कालवण


दुःख मनाचे असते अपुल्या 

उगा सुखाची केली वणवण


२.


वाद जरासा टाळू आपण

संवादाला घडवू आपण


काय हरवले काय गवसले

विचार साधे मांडू आपण


भिंती कोणी उभारल्या जर

दारे,खिडक्या खोलू आपण 


संबंधांशी नाळ जोडते 

पूर्वग्रहांना विसरू आपण


शिकुया सारे अनुभवातुनी

जीवन अपुले सजवू आपण


३.


कसे जगावे, कसे रहावे

जगापासुनी हेच शिकावे 


आठवणींना जप जाताना

क्षण सोनेरी का विसरावे


उदास डोळे स्थिरावलेले

गांभीर्याने ते वाचावे 


नकोस घोळू मनी वेदना

सुख मोलाचे लाख जपावे


रोपे जगली कुठे फारशी

उन थोडेसे त्यांस मिळावे 


...............................................

सौ. दिपाली महेश वझे, बेंगळुरू

मो. 9714393969


No comments:

Post a Comment