१.
का उमेद स्वप्न पाहण्यात संपते
शोधण्यात भाकरी हयात संपते
रोजचे नवीन प्रश्न तोंड वासती
काळजी कुण्या न उत्तरात संपते
देउ लेकरा कुठून दूध बिस्कुटे
टोचणी जिवास खात खात संपते
नोकरी तरी तुला करायची किती
पस्तिशी पुरीच शिक्षणात संपते
लावती कलागती हुशार माणसे
आपसात भांडुनी जमात संपते
गाव पेटले तरी दुरून पाहशी
मायची कधी खडी वरात संपते
२.
सांग,वांझ की फळेल गादी?
पैजेवरती मिळेल गादी !
भल्याभल्यांना गिळते चिंता
बुडाखालची ढळेल गादी
येता-जाता लोक लोळती
तमा नसे की मळेल गादी
नव्यानव्याने विचित्र वाटे
घराण्यातही रुळेल गादी
नकोस घेऊ डोक्यावर तू
छतापरी ही गळेल गादी
आपसातल्या ईर्षेमध्ये
नेम ना कधी जळेल गादी
भोगशील ही चुकून जर तू
अध्यात्माची छळेल गादी !
३.
कधी निघाले, कुठे थांबले दिवस चांगले?
कुठवर आले, कुठे चालले दिवस चांगले?
अजून सिंहासनही पुरते रुळले नव्हते
देशोदेशी रमू लागले दिवस चांगले!
तुमच्या गावी येऊ आम्ही, पक्का वादा
अपुल्या वचना कुठे जागले दिवस चांगले
राजपथाहुन नसेल दिसली वाट वाकडी
गाव आमचा पुसू लागले दिवस चांगले
वर्षामागे वर्ष चालले वाट मिळेना
तुम्हीच सांगा किती लांबले दिवस चांगले
मनातली ही गोष्ट सांगतो खरीखरी मी
माझ्यासाठी तुम्ही आणले दिवस चांगले
No comments:
Post a Comment