गंगाखेड येथे नुकत्याच घेण्यात आलेल्या गझलमंथन साहित्य संस्थेच्या पहिल्या अखिल भारतीय गझल संमेलनामध्ये डॉ. शिवाजी काळे यांचा ‘अकरावी दिशा‘ हा गझलसंग्रह प्रकाशित झाला. हा गझलसंग्रह म्हणजे एक ‘अस्सल संगमरवरी शिल्पाकृती‘.
दिसली मनाला शेवटी विश्वात अकरावी दिशा
आयुष्य वाटेवर जिच्या शोधायचे होते मला
शेरातील प्रत्येक शब्द, त्याचा वाच्यार्थ, त्याचा भावार्थ जितका महत्त्वाचा तितकाच प्रत्येक शब्दाला स्पर्श करीत जाणारा, त्याला व्यापून उरणारा, जिवाशिवाच्या अद्वैतपणाने त्याच्याशी तादात्म्य पावणारा अभ्यासू व्यासंग महत्त्वाचा जो गझलनिर्मितीच्या सर्जनात्मक प्रक्रियेचे जिवंत अंग असतो, गझलकाराच्या उत्कट व अविरत चिंतनाचा, त्या चिंतनातून आशयसंपन्न होत ओळीओळींतून फुलत जाणाऱ्या भाववृत्तीचा परिपूर्ण अर्क असतो, जो ‘अकरावी दिशा‘ मध्ये ठायीठायी उतरलेला दिसतोय.
डॉ. शिवाजी काळेसारख्या एका प्रतिभासंपन्न, विनयशील गझलकाराच्या गझलांचा आस्वाद घेणे म्हणजे येनकेन प्रकारे आपली साहित्याची आंतरिक भूक भागवणे!
एकंदरीतच गझलेत शब्दांतून भावनांचा आविष्कार रंगवून मांडण्याऐवजी तो संयमशीलतेने सूचित करणे जास्त महत्त्वपूर्ण, ताकदीचे ठरते. मानवी जीवनातील कटू वास्तव, सत्य सुंदर करुन सांगण्यासाठी निसर्गातील सौंदर्य हुडकून काढणे व दोन्ही सौंदर्यातील सादृश्य रसिकांना हृद्य, आस्वाद्य, आपलंसं वाटेल, अशा पद्धतीने प्रकट करणे काळे सरांच्या शेरांचे विशेष आहे. प्रतिकांच्या माध्यमातून आशय सूचित करत असताना त्यांच्यातील कार्यकारणभावाची संगती सहजपणे लागली तर शेराचा गर्भीत अर्थ रसिकाच्या काळजात कसा खोलवर उतरत जातो, ह्याची अनुभूती त्यांचे बरेचसे शेर वाचल्यानंतर येते. विशेष म्हणजे ही अनुभूती दीर्घकाळ आपल्या बुद्धीचा ठाव घेते आणि प्रसंगानुरूप पुन:प्रत्ययाची प्रचिती देते.
व्याकुळलेल्या नजरेमधला शेर वाचला कोणी?
मी हरणीच्या डोळ्यांमधली गझल वाचली आहे
हरणीच्या डोळ्यांमधली गझल वाचणारा हा गझलकार आपल्याला शब्दांच्या एका तरल पण आश्वासक दुनियेत घेऊन जातो.
कुऱ्हाड हाती धरलेल्यांना ओढ लागली आहे
बांधावरची बाभळ आता छान वाढली आहे
गळकी होडी वल्हवताना उशीर झाला थोडा
काठावरचे डोळे तोवर निघून गेले होते
स्वतःच्या दोन ओळींना स्वतःचा अर्थ द्यावा
इथेही पाच घरचा जोगवा नसतो पुरेसा
देऊ कसा कवडसा श्वासातल्या धुळीला
आहे कुठे झरोका अंधारकोठडीला
निर्जिव डोळे म्हणून गेले 'विसरून जा तू आईला '
कुणीच सांगू शकले नाही निरोप चिमण्या चोचीला
मागे मागे फिरून माझ्या तू दमशिल अंधारा
या बैरागी सूर्याचे घर तुला माहिती नाही
झोळीत तांदळाचे दिसलें चुकार दाणे
ओटी भिकारणीची भरली असेल कोणी
कोणतीही साहित्यिक कलाकृती रसिकांच्या, वाचकांच्या ठिकाणी एक जीवनविषयक जाणीव निर्माण करत असते. त्या कलाकृतीमधील चित्रण कोणत्याही स्वरूपात सामोरं येत असलं तरी त्याचा अंतिम प्रत्यय सुखात्मक असेल तर ती कलाकृती अभिजात ठरते. आयुष्य आनंदाने, समाधानाने जगावे अशी उर्मी प्रत्येकाच्याच ठिकाणी असते. ह्या उर्मीला बाह्य जगात ठेच लागली तर जगण्यातील तोल जातो. तो सावरण्याचा प्रयत्न करताना बरेचदा व्यक्ती साहित्याचा आधार घेताना दिसते. अशा वेळी सुखात्मक प्रत्यय देणारं साहित्य त्याला जीवित प्रेरणा देतं. काळे सरांचे कित्येक शेर अशीच सुखात्मक जीवितप्रेरणा घेऊन येतात.
काही शेर सौंदर्यप्रतितीतून भावप्रतिती देतात, काही शब्द क्रीडात्मक असूनही कार्यलक्ष्यी असतात, काही रंजनातून बोधात्मक ठरतात. शेरांचे असे वेगवेगळे प्रकार व संकल्पना संभवत असल्या तरी एकाच वेळी यातील जास्तीत जास्त हेतू केंद्रस्थानी ठेवून येणारा शेर ही त्यांच्या गझलेची आणखी एक खासियत. त्यांच्या शेरातील भाषिक अवकाश आंतरिक सूत्राने जोडलेले, भारावलेले जाणवतात. वास्तवाचे धागे निरूपद्रवी आभासाच्या स्वरूपात मांडून साहित्याचा कोणताही प्रकार जास्त लोकप्रिय करता येऊ शकतो. तशी आभासमय नशा रसिक वाचकांना आणता येऊ शकते. वाचकांच्या आयुष्यातील अतृप्तता पूर्ण झाल्याचा आभास शेरातून देता येतो. पण तो अल्पायुषी असतो. याउलट आपल्या शेरात, खयालात कल्पिताचा अंश पेरून रसिक, जाणकार वाचकांना अधिक संवेदनक्षम वास्तवात ढकलण्याचे सामर्थ्य यांच्या लेखणीत आहे आणि त्यामुळे त्यांची गझल अधिक जीवनाभिमुख, सत्यसंपन्न आहे असं विनम्रपणे म्हणावंसं वाटतं.
अती वागताना विनयशील सूर्या
दरारा स्वतःचा विसरशील सूर्या
जीवना माझ्याच काचांवर मला तू नाच म्हण
मी शहाण्यासारखा जगलो तरी वेडाच म्हण
आज तू गोतावळा दाखव मला
एकटी पडलीस की आठव मला
चांगले घडणार असले तर चुकू द्यावे गणित
एकदा तू दोन गुणिले दोन म्हणजे पाच म्हण
अर्जुन झाला मोठा योद्धा.. शंका नाही
पोपट नाही जगला पण त्या घटनेनंतर
हात हलवले म्हणून जगला बेटावरचा एक शहाणा
पाणी पाणी करुन मेला काठावरचा एक शहाणा
तुझ्यामागे सुखांचे घोडदळ आहे
मलाही वेदनांचे पाठबळ आहे
गझलेला, गझलप्रवृत्तीला नाट्यमय, काव्यमय भाषाशैलीचे वाकडे आहे असं नव्हे पण शब्दांकडे चित्त आकर्षित करुन घेणे हे गझलेचे ध्येय नाही. हा तिचा हेतू नाही. वाचकाला शेरात अंतर्भूत असलेल्या खयालाकडे, वस्तू आशयाकडे अलवार नेऊन सोडणारे ते एक साधन आहे. त्यामुळे भाषाशैली साधनाऐवजी साध्य ठरू लागली तर शब्दांची कारागिरी, प्रतिमांची रेलचेल, स्वकेंद्रीयता, अतिकलात्मकता यामुळे शेराचा कल निर्जीवतेकडे झुकण्याची शक्यता निर्माण होते आणि रसिक, ज्ञानी वाचक त्यात गुंतू शकत नाही. शाब्दिक लावण्य, काव्यमयता यांच्याही पुढे जाऊन प्रसंगी कलात्मकतेकडे दुर्लक्ष करुन, वाचकांची आशयातील, खयालातील गुंतवणूक वाढवण्याचे कसब काळे सरांच्या लेखणीला साधलंय. अर्थातच अर्थगर्भतेसोबत शब्दांच्या प्रेमात असणाऱ्या रसिक, चोखंदळ वाचकांना ही गोष्ट थोडी खटकूही शकते. हे न्यूनत्व जाणवू शकते.
सद्यस्थितीत मराठी साहित्यात गझलेला आलेला ऊत, अंतर्मुख बनण्याऐवजी बहिर्मुख होत चाललेली नव्या पिढीची जडणघडण, त्यातून उजागर होणारा आत्मकेंद्रीपणा आणि जगण्यात येत चाललेला कोरडेपणा, समाजमनाला आवेगाने व्यापणारी बधिरता या सगळ्या पार्श्वभूमीवर काळे सरांच्या गझलेचा आत्माविष्कारातून आशयाकडे आणि आशयाकडून आत्माविष्काराकडे असा होणारा दुतर्फा प्रवास रसिक वाचकाला निश्चितच दिलासा देणारा आहे. मराठी गझलविश्वातील शब्द आणि आशय यांचा वेगळा स्वयंभू आकृतिबंध म्हणून त्यांच्या गझलेकडे निश्चितपणे पाहता येईल.
मोकळे आकाश म्हणजे घर निवारा होत नाही
कोण म्हणतो पाखरांचा कोंडमारा होत नाही
उजेडातही अंधाराचे अनेक चेले होते
रस्ता चुकलेल्यांना त्यांनी गुहेत नेले होते
तो काळ होता वेगळा हा काळ आहे वेगळा
विक्रम जुना असला तरी वेताळ आहे
त्या पायांच्या गोष्टी गौरवशाली होत्या
ज्यांच्या वाटेवर केळीच्या साली होत्या
क्षणात नंग्या तलवारीही म्यान व्हायच्या
योग्यांपाशी अशा कोणत्या ढाली होत्या ?
बुडालो खोल इतका की परत फिरणे विसरलो मी
तिचे बाहेर डोहाच्या उभे असणे विसरलो मी
सरत्या वयात कळले आयुष्य काय आहे
पंढरपुरात कळले आयुष्य काय आहे
इतर काव्यप्रकारांपेक्षा गझलेत चिंतनशीलता आणि विचारप्रक्षेपण यांना एक गोटीबंद निश्चितार्थ प्राप्त झालेला असतो. त्यांच्या गझलेतून हा प्रत्यय अगदी तीव्रतेने येतो. कोणत्याही घटनेमागील आपल्या विचारशक्तीने गृहीत धरलेल्या शक्यतांच्या पलीकडे जाऊन एक सकारात्मक शक्यता आपल्याला नेहमीच खुणावत असते. अनेक जागृतीच्या क्षणांना स्पर्श करत असते. पण बहुतांश वेळा आपलं दुराग्रही मन नेमकी तीच शक्यता नजरेआड करून किंवा ठेवून स्वतःच स्वतःला दुःखी करुन घेत असतं. पण एका कलासक्त आत्ममग्न गझलकाराची नजर वजनदार विचारसूत्रे परस्परात गुंफून किती आदिम शक्यतांचा धांडोळा घेऊ शकते? हे या संग्रहात बऱ्याच ठिकाणी जाणवतं.
जीवनातील दृश्यात्मकता जशीच्या तशी खयालात उतरली आणि शेरात मांडली गेली तर तो शेर रसिकमनावर अधिराज्य गाजवतो, कालातीत होतो. कारण तो स्वाभाविक, सर्वव्यापी आणि सर्वांगपूर्ण असल्यामुळे प्रत्येकाला त्यातून काही ना काहीतरी गवसतेच. प्रेम ही जीवनेच्छेशी कमालीची निगडीत असणारी भावना आहे. माणसाच्या आयुष्यात ती केवळ एका भावनेच्या पातळीवर न राहता.. त्याचे भावजीवन व्यापून टाकते. प्रेम गझलेचाही स्थायीभाव आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष प्रेमाच्या कक्षा विस्तारत एकंदरीत सृष्टी व्यापून उरणारा प्रेमभाव जेव्हा हळुवारपणे शेरात उतरतो, तेव्हा तो शृंगाराचा सर्वांगसुंदर परिपाक असतो. लोभस शक्यता आणि निरपेक्ष प्रेमाची अनुभूती घेऊन अनेक शेर या संग्रहात येतात.
तिचे कर्तव्य दुनियेच्या मते जोखड असू शकते
तरी निव्वळ समर्पण ही तिची आवड असू शकते
तू भेटलीस तर मी राहीन का शिवाचा
तो ही हसून म्हणतो संपू नये प्रतिक्षा
ठसे शोधले मी धुक्यावर तुझे
मला नाव दिसलें उन्हावर तुझे
कदाचित सत्य भक्तांना कधी पटणारही नाही
पुजेबद्दल फुलांचे मत जरा परखड असू शकते
शिवा अंदाज बांधू का तुझ्या रंगीत भस्माचा
तुझ्यावर हक्क असणारी कुणी अल्लड असू शकते
अडवल्याने मला काही फरक पडणार आहे का
तुझ्या लटक्या विरोधाचे कवच टिकणार आहे का
अशा या मिट्ट काळोखात अवतरणे तुझेमाझे
इथे लाजून झुकलेली नजर दिसणार आहे का
निवांत जंगल, धुके, कवडसे, पुढे नितळसा तलाव हिरवा
अशा ठिकाणी बसून निश्चल तुला न स्मरणे कठीण असते
To Live and To Exist यातला फरक ज्याला पूर्णपणे कळला त्याला जीवन कळलं, जगणं कळलं. आणि ज्याला जीवन जगणं कळलं त्याला गझल कळली. एक रसिक म्हणून मला नेहमीच वाटत आलंय. To live म्हणजे केवळ जिवंत असणे आणि To exist.. म्हणजे आपण जगत आहोत याचे अवधान, व्यवधान असलेले जगणे. मानवी अस्तित्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न करणं, जीवनातील प्रत्येक क्षण उत्कटतेने जगताना आपल्या जगण्याच्या अनुभवाकडे सूक्ष्मतेने पाहणे, कधी त्यात डुंबून स्वतःचा शोध घेणं तर कधी शोधलेल्या स्वतःपासून अलिप्त, तटस्थ होऊन शांतता अंगीकारणं. हे जमायला हवं. मगच To Exist च्या पातळीपर्यंत पोहोचण्याची सुरुवात करता येईल. त्या दिशेकडे अंगुलीनिर्देश करणारे अनेक शेर हे या संग्रहाचे आणखी एक वैशिष्ट्य!
शेर ही एक विशिष्ट भाषिक संरचना आहे. पण केवळ शब्द वा अर्थ वा शब्दार्थ म्हणजे शेर नव्हे. शब्दांचे विश्लेषण करुन स्वतःच्या विशिष्ट शैलीसह गझलकार त्यांना काळजीपूर्वक व आदरपूर्वक वापरतो. त्यांना वांच्छित आकार देतो. हेच गझलेचे सृजन. इंद्रियगम्य वा भावनात्मक अनुभवांच्या पलीकडे गेल्याविना ही सृजनता आत्मप्रत्ययाच्या स्वरूपात गझलेत उतरत नाही. हा आत्मप्रत्यय म्हणजेच गझलेचा प्राण, गझलेचे चैतन्य!‘अकरावी दिशा‘.
आयुष्य एखाद्या अनाकलनीय चित्रासारखे आहे
काही कळत नसले तरी थांबून बघण्यासारखे आहे
छुपी लढाई लढताना तो अगतिक झाला आहे
प्रत्येकाचा मेंदू हतबल सैनिक झाला आहे
मनात वादळ भरुन कुणाला इजा न करणे कठीण असते
सरी लपवल्या जरी ढगांनी विजा लपवणे कठीण असते
पानाफुलांचे स्वप्न पाहू शक्यता निर्माण झाल्यावर
माझ्यामधे टिकणे तुझे वाळूत रुजण्यासारखे आहे
तिच्यामधे जग बुडून जावे अशी उदासी मला मिळावी
प्रफुल्लतेवर तरंगणाऱ्या जगात रमणे कठीण असते
कवचकुंडले तपासण्याची ज्याला त्याला घाई !
नव्या युगाचा मृत्यू आता ऐच्छिक झाला आहे
कुणीतरी म्हटल्याप्रमाणे 'Our sweetest songs are those that tell of saddest thought. ' हे गझलेच्या बाबतीत विशेषार्थाने खरं आहे. कारण या विधेत दुःख विलक्षण उत्कटतेने आविष्कृत झालेले दिसून येते. अर्थात कोणताही भाव शब्दांत अस्सलपणे उतरण्यासाठी आधी स्वतःच्या मनाचे उत्खनन करावे लागते. त्यातून अलौकिक चिजा बाहेर येण्याची दाट शक्यता असते. दुसऱ्यांच्या मनाचे उत्खनन करून फारसे काही हाती लागत नाही. जो स्वतःसाठी, स्वात्मशोधासाठी लिहीत जातो त्याची विचारधारा तितकीच universal होत जाते हे काळे सरांच्या खालील शेरात जाणवतं-
कुणी मालकी सांगितली तर हसून उत्तर देतो
आता भोळा शिवा मनाने वैश्विक झाला आहे
गझलकाराची उच्चस्तरीय प्रतिभा आणि जबरदस्त रचनाकौशल्य यांचा समसमा संयोग, जाज्वल्य मनोवृत्तीचा हुंकार म्हणजे ‘अकरावी दिशा‘.
................................
डॉ. स्नेहल कुलकर्णी
गारगोटी,
9922599117
No comments:
Post a Comment