१.
श्वास असेतो पदोपदी तर उपेक्षितागत प्रवास झाला
श्वास संपल्यानंतर कोठे सन्मानाचा थांबा आला
शासननोंदी त्या भागाची चोख सुरक्षा प्रदान होती
शहरामधला तोच भाग मग कसा अचानक पूर्ण जळाला ?
कोण मनातुन करतो आहे द्वेष सतत या निळ्या फुलांचा ?
कोण सारखा ओतत आहे कुंड्यामध्ये जहरी प्याला ?
महत्त्व नाही मुळी यास की किती अंतरे चाललास तू
महत्त्व याला आहे की तू वाट कोणती चालुन आला
जीवनभर मी बोलत बसलो तरी न काही सांगू शकलो
मौन राहुनी पण तो सारे सांगुन गेला या जगताला
तुझा सुडाग्नी शमला नाही, नाही कळले मजला सुद्धा
निर्जीव देहि पुन्हा आपल्या कुठून फुंकू मी प्राणाला ?
उतरुन गेला गर्व शेवटी जो पायांवर होता मजला
दोन घडीचा प्रवास जेव्हा चार जणांच्या खांदी झाला
२.
फूल , पाने टाळुनी मी सत्य जेव्हा मांडले
शेर माझे या जगाला खूप झोंबू लागले
हीच बस होती तफावत आपल्या अश्रूंमधे
तू निरंतर ढाळले अन् मी निरंतर जाळले
जिंकला शत्रू पुन्हा कष्टाविना अपुला लढा
ऐन वेळी मित्र सारे आपसातच भांडले
बोलला खोटे असे ठासून तो माणूस की
बोल त्याचे सर्व आम्हा सत्य वाटू लागले
आरशातुन कोण मजला रोज निरखुन पाहतो
लक्तरे अंगावरी अन् केस त्याचे वाढले
वाट जर निव्वळ फुलांची चालुनी आलास तर
जीवना मग पाय इतके कां तुझे रक्ताळले ?
३.
लळा लावेल तो नकली मुला,गाफिल नको राहू
गळा कापेल मग असली मुला, गाफिल नको राहू
कधी रानात होती जी अता ती श्वापदे सारी
तुझ्या गावातही शिरली मुला, गाफिल नको राहू
मलमपट्टी निमित्ताने तुझ्या नाजूक जखमेची
पुन्हा काढेल तो खपली मुला, गाफिल नको राहू
अशा या काळरात्रीला सुरक्षेची तुला त्यांनी
जरी पुरती हमी दिधली मुला,गाफिल नको राहू
कधी जी यंत्रणा होती जिवाच्या रक्षणासाठी
जिवावरती अता उठली मुला, गाफिल नको राहू
शहरभर पेटलेली आग आटोक्यात आल्याची
खबर पक्की जरी असली मुला, गाफिल नको राहू
तुझ्या घटनेस भक्षाया करोनी वेष बगळ्यांचे
गिधाडे भोवती जमली मुला,गाफिल नको राहू
.................................
मसूद पटेल ९६०४६५३३२२
No comments:
Post a Comment