तीन गझला : नरेन्द्र पाटील

 




१.


गाव,वस्ती अन् शहर वादात होते

रोज हृदयावर नवे आघात होते


घाव देणारा सुरा अज्ञात होता

पण सुऱ्यावर ओळखीचे हात होते


रोज येथे कापरे भरते धरेला

काय त्यांनी ठेवले गर्भात होते


छप्परे अभिमान, गर्वाची उडाली

केवढे वादळ तिच्या प्रेमात होते


याचसाठी मी खरे पुसलेत डोळे

गावही माझे अता येण्यात होते


२.


प्रेयसी पाहिजे, पण अशी पाहिजे,

कट चहातुन जशी वेलची पाहिजे!


शेर वाचून हा, ती म्हणाली मला

एक मतला नको आणखी पाहिजे!


प्रेम जर का तुझे फक्त आत्म्यावरी,

ती तुला अंतरी भेटली पाहिजे!


धून मौनातली छेड मित्रा अशी

आग पाण्यातही लागली पाहिजे!


रंग गोरा असो की असो सावळा,

त्यात माणूसकी शोधली पाहिजे!


शेतवाडी नको, कामधंदा नको,

फक्त परशा तुला आरची पाहिजे!


ज्ञान तू हे तुझे,घे तुला राहू दे,

मज तुकोबा तुझी पालखी पाहिजे!


दोन दणकट कडे घाल हाती मुली

सोड तू हट्ट की बांगडी पाहिजे!


दे दमाने अशी विस्तवाला हवा

जिद्द हृदयातली पेटली पाहिजे!


३.


पुन्हा गावात न्या मजला, कुडाचे घर तिथे आहे

जिथे आयुष्य दरवळले, असे अत्तर तिथे आहे!


जरा पडताळुनी बघ तू स्वतःच्या आतले पुस्तक

तुझ्या एकेक प्रश्नाचे खरे उत्तर तिथे आहे!


तुला मी सांगतो मित्रा, जिथे ही चालली वारी

जिवाचे जो करी सोने असा पत्थर तिथे आहे!


तुझ्या हृदयात कोणाची तरी चाहूल जाणवते

तुझ्या डोळ्यांत दिसते जी, तिचा वावर तिथे आहे!


जपूनी ठेवले आहे तिच्या मी प्रेमग्रंथाला

'सख्या लव यू' गिरवलेले तिचे अक्षर तिथे आहे!


मनाचा वाहु दे निर्झर, खळाळू दे नितळ, निर्मळ

उगम प्रत्येक शब्दाचा, छुपा सागर तिथे आहे!


तिच्या ओठांतली परवा, मिठाई चाखली होती

मधाला सोडते मागे,अशी साखर तिथे आहे!


6 comments:

  1. अतिशय सुंदर!!👌👌💐 अभिनंदन 🎉

    ReplyDelete
    Replies
    1. काळजातून धन्यवाद 🙏😊🌹

      Delete
  2. क्या बात है, बढीया👌🏻 खुप शुभेच्छा👍🏻

    ReplyDelete
    Replies
    1. काळजातून धन्यवाद सर 🙏🌹😊

      Delete
  3. अतिशय सुंदर गझल

    ReplyDelete
  4. काळजातून धन्यवाद विजू दा !... 🙏😊🌹

    ReplyDelete