अमरावती जिल्ह्यातील परतवाडा आणि अचलपूर ही जोडगावे खरं म्हटलं तर आडवाटेवरील तालुक्याचं एक ठिकाण! पण सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या या निसर्गरम्य गावावर सरस्वतीची विलक्षण कृपा आहे. प्रा. राम शेवाळकर यांचे अचलपूर हे जन्मगाव! तसेच परतवाड्यात गोनिदा, पु.भा.भावे, अरुण साधू अशा अनेक नामवंत साहित्यिकांचे परतवाडा येथे वास्तव्य राहिले आहे. या गावात साहित्य, नाट्य, संगीताची गौरवशाली परंपरा आजही कायम आहे.
अशा या रसिक गावात अनिल पाटील सारखा प्रतिभाशाली गझलकार निर्माण झाला तर त्यात नवल कसले? साक्षात सुरेश भटांचा वरदहस्त लाभलेल्या या गझलकार आणि वऱ्हाडी कवीचा जन्म १९६० साली झाला आणि त्याने २०१८ साली या जगाचा निरोपही घेतला. तो परतवाडा येथील न.पा.हायस्कूल येथे शिक्षक म्हणून कार्यरत होता.
पण या ५८ वर्षाच्या अल्पायुष्यातही त्याने विपुल आणि दर्जेदार काव्यनिर्मिती केली. त्याचे यातिक, गाफील, मातेर आणि चंद्र नभी गझलेचा हे चार गझल संग्रह प्रकाशित झाले आहेत. त्याच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळालेत. पण मुख्य म्हणजे त्याच्या अनेक गझलांना रसिकांची पसंती मिळाली.
त्याचा बहुतेक वेळी मुसलसल गझल लिहिण्याकडे कल होता. तसेच रोमँटिक, प्रेमविषयक विषय गझला त्याने अत्यंत खुमासदार शैलीत लिहिल्या आहेत. आता उदाहरणादाखल त्याची गाजलेली 'अचानक 'ही गझल पाहा!
'अचानक जीभ ही अडते तुला मी हे कसे सांगू
मला तू खूप आवडते तुला मी हे कसे सांगू
निळ्या साडीत येताना जरा सावध असावे तू
निळे आभाळ गडगडते तुला मी हे कसे सांगू
तुझ्या मेघापरी काळ्या जरा सांभाळ केसांना
जराशी वीज कडकडते तुला मी हे कसे सांगू
पुढे तर मग तो या कल्पनेत अजूनच रममाण होतो आणि त्याचे शेर अधिकच खुमासदार होतात.
तुझ्या नाजूक देहाचा जरासा तोल जातो अन्
हृदय माझेच धडधडते तुला मी हे कसे सांगू
खळीचा चंद्रमा गाली उषेची लालिमा अधरी
मन भ्रमरापरी उडते तुला मी हे कसे सांगू '
ही बहारदार गझल आजही वाचताना दाद घेऊन जाते. सुप्रसिध्द गझलकार प्रदीप निफाडकर यांनी त्याच्या गझलेबाबत म्हटले आहे की, 'गझल प्रकाराचे एक वैशिष्ट्य आहे की कधी ती हळुवार फुलते तर कधी अंगार ओकते. अनिलच्या गझलेत हे दोन्ही आढळते.'
त्याची अजून एक गझल 'खंत' पण हृदयाला स्पर्शून जाते.
'आता कुणावर हा जीव लावायचा नाही पुन्हा
तो दाह विरहाचा मला सोसायचा नाही पुन्हा
प्रारब्ध माझे हारणे कळले मला माझे बरे
तू मोडलेला डाव मी मांडायचा नाही पुन्हा
तुजवीण जगतांना मनी इतकीच खंत आहे
हा जन्म मजला वा तुला भेटायचा नाही पुन्हा
पण त्याची जी गझल सगळ्यात जास्त गाजली ती म्हणजे 'आई '! कुणाच्याही डोळ्यात पाणी यावे इतकी ही गझल! कवी यशवंत यांच्या 'आई म्हणोनी कोणी ' या कविते सारखीच हृदयस्पर्शी!
'नाही मधात नाही वा अमृतात नाही
आई तुझ्या दुधाची गोडी कशात नाही
तू पाय टाकलेल्या मातीस मोल येई
सर त्या तुझ्या नखाची कोण्या नरात नाही
आजन्म हा मिळावा पदरी तुझ्या निवारा
देवाधि देवतांच्या जो मंदिरात नाही
करतो प्रणाम आता प्रत्येक माऊलीला
पृथ्वीतलावरी या आईस जात नाही '
हृदयाला भिडून जाणारी ही गझला प्रत्येक वाचकाला आपल्या आईची आठवण देऊन जाते आणि त्याचे डोळे नकळत पाणावतात. कुठल्याही कवीला यापेक्षा अधिक काय हवं असतं?
१९९० साली सुरेश भटांनी स्वतः चोखंदळपणे निवडलेल्या गझलांचा संग्रह 'काफला ' या नावाने प्रकाशित केला होता. त्यात अनेक तरुण गझलकारांच्या रचना होत्या. त्यामध्येही अनिलने दमदार हजेरी लावली होती. या प्रातिनिधिक गझल संग्रहात अनिलच्या 'अंगण ' आणि 'बिनधास ' या दोन गझला समाविष्ट झाल्या होत्या.
नेहमी प्रमाणेच त्याने 'अंगण ' ही गझल आपल्या खास रोमँटिक शैलीत लिहिली होती.
'कुणा कळेना कुणा दिसेना घरात माझ्या
तुझा परी चेहरा हसे हया मनात माझ्या
'नको असे चांदणे,नको खेळ तारकांचा
जरा तरी धीर द्यावया ये नभात माझ्या
उगीच का कारणाविणा हा वसंत आला?
आता तरी वेचण्या फुले ये मनात माझ्या
पुन्हा तुझा तोच ओळखीचा सुगंध आला
जपून आली तू जरी अंगणात माझ्या '
वाचल्यावर वाहवा म्हणावे अशी ही गझल! यावर सुरेश भटांचे संस्कार स्पष्टपणे जाणवतात. पण आमच्या त्या पिढीला सुरेश भटांच्या गझलांनी वेडच लावले होते.
'काफला' मधील अनीलाची दुसरी गझल 'बिनधास' नावाप्रमाणेच बिनधास होती.
'चूपचाप रात्र माझी सजवून येत जा तू
हळुवार हात माझ्या हातात देत जा तू
एकेक जन्म मीही येतो तुझ्याच साठी
आता तुला हवे ते मागून घेत जा तू '
आणि या गझलेचा जोरकस मक्ता पुढीलप्रमाणे -
'माझ्या तुझ्या मिठीला हे चंद्रसूर्य साक्षी
अन् कुंकवास माझ्या बिनधास लेत जा तू '
अशाप्रकारे दमदार गझल लिहिणारा अनिल पुढे मग वऱ्हाडी कवितेकडे वळला. तेथेही डॉ. विठ्ठल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने उल्लेखनीय यश मिळवले. त्याच्या वऱ्हाडी काव्यसंग्रहाला साक्षात पुलंनी अभिप्राय देऊन दाद दिली होती.त्यातील पुलंची काही वाक्ये, विषयांतर झाले तरी, येथे देण्याचा मोह आवरत नाही; इतका सुंदर तो अभिप्राय आहे. 'प्रमाण भाषेतील कविता पाहुण्यासारखी नीटनेटके कपडे घालून ती येते, सभ्यपणाने किंचित अलिप्तपणाने वावरते. बोली भाषेतील कविता कशी उराउरी भेटते. त्या भेटीत सहजपणा असतो. जे पोटात आहे ते ओठात उमलले असा प्रकार असतो. तुम्ही (म्हणजे अनिल पाटील) हा सहजसंवाद कधी शोषित समाजाच्या दुःखाने पोळणाऱ्या जीवाच्या भूमिकेतून तर कधी निखळ प्रेम भावनेतून एक प्रेमिक म्हणून परिणामकारकरित्या साधला आहे. तुमच्या कविता विविधरंगी आहेत. त्या कधीच एकसुरी वाटत नाही. '
पुलंकडून अशी दाद मिळणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही! त्याच्या वऱ्हाडी भाषेतील काव्य संग्रहांना पण अनेक पुरस्कार मिळालेत.
तर असा हा विलक्षण प्रतिभावान गझलकार आणि कवी अकालीच हे जग सोडून निघून गेला. त्याला अजून आयुष्य लाभले असते तर त्याने कदाचित यापेक्षाही अधिक उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली असती. पण तसे व्हावे हे नियतीच्या मनात नव्हते. मात्र त्याच्या जोरकस गझला आणि वऱ्हाडी कवितांमधून तो आपल्याला नेहमीच भेटत राहील. त्यानेच म्हटल्याप्रमाणे -
'असेच डोळे मिटून तू ऐक गीत माझे
हळूच जा तू बुडून ओल्या स्वरात माझ्या ! '
(हा लेख लिहिण्यासाठी परतवाडा येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार आणि साहित्यिक प्रा. चंद्रकांत बहुरूपी आणि प्रा. अशोक बोंडे सर यांनी जी मोलाची मदत केली, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार!)
.................................
अविनाश चिंचवडकर
बंगलोर
9986196940
avinashsc@yahoo.com
स्व.अनिल पाटील हे उच्च कोटीचे गझलकार होते . त्यांना कोटी कोटी वंदन !
ReplyDeleteनावात साधर्म्य असल्याने खुप वेळा माझ्या गझलाना कमेंटमधे विचारले जाई अरे अनिल इतके दिवस कुठे होतास तू ? फोन येत असत , विचारणा होई ,अरे मित्रा कुठे आहेस तू , मनापासून दाद मिळायची मग मला सांगावे लागे आपण ज्यांच्याबद्दल विचारणा करत आहात ते आता आपल्यात नाहीत . ते अचलपुरचे आणि मी जळगाव खान्देशचा !
मग ते म्हणत आपली गझल वाचुन वाटले की इतके छान लिहिता की त्यांची आठवण झाली ! मग वाटे की आपणही त्यांच्याइतकेच प्रभावी लेखन करू लागलो आहोत !
अतिशय सुंदर लेख , आवडला !
खूप धन्यवाद! आपल्याला मनःपूर्वक शुभेच्छा!
Deleteधन्यवाद अविनाश चिंचवडकर सर.!
ReplyDeleteस्व. श्री. कविवर्य अनिल पाटील हे आमचे काका, तुम्ही लिहलेल्या या लेखा निमित्य त्यांच्या आठवणी ना पुन्हा एकदा उजळ मिळाली.
"आठवणीने त्यांच्या मी बहरून गेलो,
नकळत अश्रुना वाट दाखवून गेलो."
अंबर पाटील,
अमरावती.
This comment has been removed by the author.
Deleteधन्यवाद अंबर! अनिल हा माझा चांगला मित्र होता. आम्ही अनेक छोट्या मोठ्या कविसंमेलनात भाग घेतला होता. त्याचे वडील अ.आ.पाटील सर तर माझे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्याची प्रतिभा विस्मरणात जाऊ नये यासाठी हा प्रयत्न!
Delete