दोन गझला : श्रीकृष्ण राऊत

 







१.

मारून दोन गोळ्या मरणार काय गांधी?
पुरुनी पिढ्यापिढ्यांना उरणार हाय गांधी!

लावा उगाळुनी रे दुखण्यावरी महात्मा
हा रामबाण आहे, देशी उपाय गांधी

खोटेच युद्ध लढते घोड्यावरून नकली
ह्या मतलबी नटीला
कळणार काय गांधी?

दारू पिऊन रात्री दोघीस बाप मारे
लेकीस दूध पाजी होऊन माय गांधी

दररोज नासणारे हे दूध राजधर्मी
सत्यावरी तरीही धरणार साय गांधी

शोधून नोकरीला कंटाळला कधीचा
आता भल्याभल्यांना पाजेन चाय गांधी!

२.

राजवाडा भ्रष्ट झाला,भ्रष्ट हा दरबार बापू
थांबला गांधीगिरीने काय भ्रष्टाचार बापू?

व्यापतो जो देह सारा,खात जातो काळजाला
देत नाही औषधाला दाद का आजार बापू.

मोठमोठ्या चार बाता स्टेजवरती सांगणारा
मागताना दोन टक्के केवढा लाचार बापू.

चोरलेला हार आहे,शाल आहे मारलेली
गोड कर मोठ्या मनाने आमचा सत्कार बापू.

एक मुन्नी कोवळी अन् पोरसवदा एक शीला
मध्यरात्री नाचणारा हा कुणाचा बार बापू?

ऐकले चोरीस गेला बंद पेटीतून चष्मा
आंधळ्यांचे स्वप्न झाले शेवटी साकार बापू!

जिंकणारा राम होतो,सत्य त्याची रामलीला
हारणार्‍या रावणाचे कोसळे सरकार बापू.

................................
श्रीकृष्ण राऊत,
द्वारा अॅड. सुनील नरवाडे,
मंगलमूर्ती नगर,
पुसद ४४५२०४
जि. यवतमाळ
मो.८६६८६८५२८८

4 comments:

  1. दोन्ही गझला अप्रतिम 👌👌

    ReplyDelete
  2. दोन्ही गझला अप्रतिम 👌👌

    ReplyDelete
  3. व्वा सर! दोन्ही गझला अप्रतिम! 👍

    ReplyDelete